झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. ही मालिका तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. मालिकेतील कलाकार श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती झाली होती. त्याचबरोबर मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच मायरा वायकुळनेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एकूणच मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. पण फार कमी कालावधीतच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका टीआरपीमध्येही अव्वल स्थानावर होती. मात्र या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मालिका संपल्यानंतर अनेक चाहत्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या भागाची मागणी केली होती. मालिकेचा दुसरा भाग सुरू होणार असल्याच्या अनेक चर्चाही सोशल मीडियावर होत असतात. अशातच आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल स्वत: श्रेयसने तळपदेने भाष्य केलं आहे.
श्रेयस तळपदे सध्या त्याच्या झी मराठीवरील ‘चल भावा सिटीत’ या शोमुळे चर्चेत आहे. याच शोच्या निमित्ताने श्रेयसने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजश्री मराठीशी बोलताना श्रेयसने ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या दुसऱ्या भागाबद्दल असं म्हटलं की, “माझ्या टाइमलाइनवर हे रोज असतं की, सर ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा सीझन घेऊन या. मला वाटतं जे प्रेम या मालिकेला मिळालं आहे. ते खूप अभूतपूर्व होतं.”
यापुढे त्याने म्हटलं की, “कोविडसारख्या काळातून बाहेर येत तुम्ही असं काहीतरी करता आणि त्याला इतकं प्रेम मिळतं तेव्हा नक्कीच आनंद वाटतो. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका जर आम्ही पुन्हा करु शकलो तर मला खरंच खूप आनंद होईल. पण सध्या तरी मी ‘चल भावा सिटीत’ हा शो करण्याचा आनंद घेत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची पूर्ण टीमही आनंदी आहे. प्रार्थना आणि मी आता झी गौरवही केला. त्यामुळे चाहत्यांसाठी काही सरप्राइजेस आहेत. बघू आता पुढे पुढे काय होतं.”
दरम्यान, ‘चल भावा सिटीत’ या शोच्या निमित्ताने श्रेयसने छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती यांचं दर्शन घडवणार असून १५ मार्चपासून दररोज रात्री ९:३० वाजता झी मराठीवर हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांसमोर हळुहळू उलगडत जाईल.