चित्रपट, नाटक, मालिका यांमधील काही पात्रे जशी प्रेक्षकांची लाडकी असतात, तशाच काही भूमिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात, तसेच काही डायलॉग्जही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. एखाद्या पात्राचे असे काही निवडक डायलॉग्ज लोकप्रिय ठरताना दिसतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शिवा'(Shiva) मालिकेतील शिवा हे पात्र मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. धाडसी असणारी शिवा लोकांच्या मदतीला कायमच धावून जाताना दिसते. कोणावर अन्याय झाला, तर तिला सहन होत नाही. प्रसंगी ती लोकांशी भांडते आणि त्याबरोबरच ती मारामारीदेखील करताना दिसते. तसेच, ‘केसाला धक्का, तर कपाळाला बुक्का’ हा डायलॉगही शिवा म्हणताना दिसते. हा डायलॉग शिवाची ओळख झाला आहे. विशेष बाब म्हणजे आता शिवाचा हा डायलॉग लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ही म्हणताना दिसत आहे.
अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा ही भूमिका साकारली आहे. पूर्वा कौशिकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूर्वा व श्रेयस तळपदे डान्सचा सराव करताना दिसत आहेत. हृदयी वसंत फुलताना… या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. त्यांचे काही फोटोही यामध्ये पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या शेवटी पूर्वा व श्रेयस तळपदे एकत्र दिसत असून, अभिनेता शिवाचा लोकप्रिय ठरलेला डायलॉग म्हणताना दिसत आहे.
पूर्वा पुष्पाची लोकप्रिय ठरलेली स्टाईल करताना दिसत आहे. तर श्रेयस “केसाला धक्का, तर कपाळाला बुक्का”, असे म्हणताना दिसत आहे. पूर्वाने हा व्हिडीओ शेअर करताना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा उल्लेख केला आहे. तसेच श्रेयस तळपदेला टॅग करीत जेंटलमन, असे म्हटले आहे.
पूर्वाच्या या व्हिडीओवर अभिनेत्रींनी कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे. शरयू सोनावणे व प्राप्ती रेडकर यांनी हार्ट इमोजी शेअर करीत तिचे कौतुक केले आहे. तर मालिकेत ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सृष्टी भालेकरने एकच नंबर ना भाई, अशी कमेंट केली आहे. चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर प्रेम व्यक्त केले आहे.


दरम्यान, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील अभिनेत्री श्रेयस तळपदेबरोबर डान्स करताना दिसत आहेत. त्यामध्ये वल्लरी विराज, शरयू सोनावणे यांचा समावेश आहे. आता झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात आणखी काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.