गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पौराणिक, आध्यात्मिक मालिका आल्या आहेत. विविध देवांच्या गुरूंच्या आपल्याला माहीत नसलेल्या कथा या मालिकांमधून उलगडल्या जातात. १९८७ साली रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिने इतिहास रचला. करोना काळातही ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली गेली. तर आता पुन्हा एकदा रामायण छोट्या पडद्यावरून उलगडलं जाणार आहे.
‘सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन’ने रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याचा शिवधनुष्य उचललं आहे. ‘श्रीमद् रामायण’ असं या मालिकेचं नाव असेल. नुकतीच या मालिकेची घोषणा करण्यात आली.
या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिव्यांनी लखलखलेली अयोध्या नगरी दिसत आहे. तर या प्रोमोच्या शेवटी पाठमोरी उभे असलेली श्रीरामांची छायाही दिसत आहे. पुढील वर्षी जानेवारीत ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत कोणते कलाकार झळकणार हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
या प्रोमोवरून ही एक भव्यदिव्य मालिका असेल हे स्पष्ट झालं आहे. या मालिकेचा प्रोमो आता खूप व्हायरल होत असून या मालिकेबद्दल प्रेक्षक उत्सुकता व्यक्त करत आहेत.