श्रीरंग गोडबोले(Shrirang Godbole) यांची दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, निर्माता, गीतकार, अशी त्यांची ओळख आहे. पिंपळपान, घडले बिघडले, अग्निहोत्र, अमर प्रेम, गुंतता हृदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट, ती फुलराणी अशा मालिकांसाठी ते ओळखले जातात. त्याबरोबरच मराठी पाऊल पडते पुढे, एकापेक्षा एक, तुझ्यात जीव रंगला, अग्गं बाई सासूबाई अशा अनेक मालिकांची शीर्षकगीते त्यांनी लिहिली आहेत. तसेच गाजलेल्या चित्रपटांतील काही गाणीदेखील त्यांनी लिहिली आहेत. आता एका मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेमा, मराठी प्रेक्षकवर्ग यांवर वक्तव्य केले आहे.

मराठीची गळचेपी…

श्रीरंग गोडबोले यांनी नुकतीच ‘बातों बोतों में’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी लंपन या वेब सीरिजविषयी बोलताना श्रीरंग गोडबोले यांनी म्हटले, “या मालिकेचे सातच एपिसोड आहेत. त्यामध्ये १० गोष्टी सांगितल्या आहेत. ती मालिका खूप सुंदर झाली. आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये म्हणजे २०२४ मध्ये गोव्यात भारतातल्या सर्वांत बेस्ट वेब सीरिजचा पुरस्कार या मालिकेला मिळाला. त्यामध्ये अनेक गाजलेल्या सीरिजचा समावेश होता. मात्र, ‘लंपन’ला पुरस्कार मिळाला. आपल्याकडे मराठीमध्ये त्याचे कोणाला महत्वही कळले नाही. कारण- आपल्या मराठी प्रेक्षकांचं असं आहे की, टीव्हीवर फुकट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ते बघत नाहीत.

सोनी लिव्हवरती जाऊन २०० रुपये भरून ते बघण्याचे कष्ट कोणीही घेत नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुमची मराठी सीरिज कोणी बघतच नाही, तुम्हाला काम कशाला द्यायचं? मराठी लोक कुठे पाहतात? प्रकाशनारायण संतांची पुस्तकं खपतात तरी कुठे म्हणजे किती आवृत्त्या निघाल्यात. मराठी लोक पुस्तकं वाचत नाहीत. मराठी लोक खर्च करून सिनेमा बघत नाहीत. जे फुकट असेल तर पौष्टिक, हे आपलं मराठी लोकांचं तत्त्व आहे. आपला मराठी समाज इतका भोंदू आहे ना इतका भोंदू समाज दुसरा कुठलाही नाही. हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतो. याचं कारण म्हणजे, ते नुसतं ओरडतात की, मराठीची गळचेपी होतेय. मराठी भाषेची पीछेहाट होतेय.”

पुढे त्यांनी म्हटले, “मी जेव्हा ‘चिंटू ‘चित्रपट केला. गोरेगावला ओबेरॉय मॉलमधील मल्टीफ्लेक्स आहे. तिथे मी आणि पुष्कर श्रोत्री उभे होतो. तिथे एक अॅडल्ट फिल्म- गुन्हेगारीवर आधारित एक चित्रपट लागला होता. शेजारीच ‘चिंटू’ लागला होता. माझ्या माहितीतील एक मराठी कुटुंब तिथे आलं. दोन मुलं आणि आई-वडील, असं ते कुटुंब होते. मला वाटलं की ते ‘चिंटू’ चित्रपट बघण्यासाठी आलेत. मी त्यांना या वगैरे, असं म्हटलं. ते मला म्हणाले की, तुम्ही इकडे कुठे? त्यांना सांगितलं की, आपली फिल्म आहे. ते म्हणाले की, आम्ही हा दुसरा चित्रपट पाहण्यासाठी आलो आहोत. म्हटलं दोन लहान मुलं घेऊन हा चित्रपट पाहण्यास चालला आहेस. तो ब्ल्यू फिल्मसारखा आहे. तू ‘चिंटू’ का बघत नाहीस? तर तो मला म्हणाला की, आम्ही मराठी सिनेमे बघत नाही. तो टीव्हीला येतो. आम्ही टीव्हीला आला की मराठी सिनेमा बघतो.

आता मी सगळ्यांना सांगतो की, ‘लंपन’ बघा. त्याला व्ह्युअरशिप नाहीये म्हणून चॅनेल म्हणतं की, तुम्ही पुढचा सीझन नका करू. मी त्यांना म्हटलं की, आपण दुसरा सीझन करूयात. ते मला म्हणतात की, तुमचा कंटेट चांगला आहे; पण कोणी बघत नाही”.