शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale)या अनेक मराठी-हिंदी मालिका, चित्रपट व नाटकातील त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘काहे दिया परदेस’, ‘हम हैं ना’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘लापतागंज’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा अनेक मालिकांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. याबरोबच ‘क्षणभर विश्रांती’, ‘घरत गणपती’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘बस्ता’ अशा अनेक इतर चित्रपटांतदेखील त्या महत्त्वाच्या भूमिकांत दिसल्या. आता अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी एका मुलाखतीत मराठी भाषेविषयी हिंदी कला क्षेत्रात गैरसमज आहे, असे म्हटले आहे.
छोट्या भूमिका साकारण्यास मला फार मजा येते
शुभांगी गोखले यांनी नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत भूमिका कशा निवडतात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना शुभांगी गोखले यांनी म्हटले, “मला भूमिका सगळ्यात महत्त्वाची वाटते. ती जर छोटी असेल, तर मला जास्त आवडते. त्यामध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवू शकता. मोठ्या भूमिकेत तर सगळं येतंच; पण छोट्या भूमिका साकारण्यास मला फार मजा येते. मला भीती वाटत नाही; उलट खूप चॅलेंज वाटतं. कारण- आम्ही ‘टिपरे’ करत असताना केदारने ‘अगं बाई अरेच्चा’ची जुळवाजुळव सुरू केली होती. तो मला म्हणाला की, संजय नार्वेकराच्या आईची भूमिका तू कर. मी त्याला म्हटलं की, अरे आपलं शूटसुद्धा सुरू आहे. मी थोडा विचार केला आणि त्याने स्क्रिप्ट सांगितल्यावर म्हटलं की, मला ही भूमिका करायची नाही. मी म्हटलं की, मला ती बॉसची छोटी भूमिका साकारायची आहे. त्याने कर म्हटलं.”
मला जाणून घ्यायचं होतं की, त्या चिठ्ठीत काय लिहिलंय…
‘लापतागंज’मधील त्यांनी साकारलेल्या बिहारी या भूमिकेविषयी त्यांना विचारले असता, शुभांगी गोखलेंनी म्हटले, “लापतागंज ही खूप उत्तम मालिका होती. तिथे त्या सेटवर काय झालं होतं की, ती भूमिका वेगळंच कोणीतरी करणार होतं. पण, ते काय झालं नाही. तर मला अचानक फोन आला आणि त्या भूमिकेसाठी मी लहान होते. मी भेटायला गेले. अश्विनी धीर म्हणून मेकर आहे. खूप चांगला लेखक व दिग्दर्शक आहे. त्याने माझ्याशी गप्पा मारताना एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या त्या प्रॉडक्शन कंट्रोलकडे दिली. तो मला म्हणाला की, मी शरद जोशींवर लिहितोय. तर मी त्याला म्हटलं की झरता नीम, असंभव ही पुस्तकं मी वाचली आहेत. त्याला वाटलं की, मी काहीतरी वाचलं तरी आहे. त्या प्रॉडक्शनने मला सांगितलं की, मालवणीत शूट असणार आहे. सात-दहा दिवस तुमचं काम असू शकतं. मला छान वाटलं की, इतक्या छान प्रोजेक्टमध्ये आपण काम करतोय. मी त्याला म्हटलं की, मला त्या चिठ्ठीत काय लिहिलंय बघायचंय. कारण- पैशांचं बोलणं झालं होतं. मला जाणून घ्यायचं होतं की, त्या चिठ्ठीत काय लिहिलंय ते. मी त्याला म्हटलं की, नाही तर मी ही भूमिका करत नाही. तो म्हटला की, त्याने लिहिलंय की ही करेल. मला खूप छान वाटलं की, त्याला विश्वास वाटला की, मी हे करू शकेन. नाही तर मराठी गोखले आणि तिचं काय, असं झालं असतं.
“पण मराठी मालिका करण्याआधी ‘डॅडी समजा करो’ ही मालिका केली होती. त्यात मध्य प्रदेशमधली बिलासपूरची एक बुवा असते. मी जी मजा घेतली आणि ते क्रेडिट आनंदला जातं. त्यानं मला खूप प्रोत्साहन दिलं. माझे खूप लाड केले. मला प्रोत्साहन मिळालं. आता जर ती मालिका पुन्हा दाखवली, तर मी अभिमानाने सांगू शकते की, बघा मी कसा वन सीन वन शॉट दिला आहे किंवा कशा प्रकारचे सीन आम्ही केले आहेत.”
“लापतागंजच्या सेटवर तर माझ्याबद्दल असे म्हणायचे की, त्या बिहारी आहेत. त्यांनी मोहन गोखलेशी लग्न केलं होतं. मी कोणाचाही गैरसमज दूर करायला गेले नाही. एकमेकांत त्यांचे वाद चालू असायचे; पण कान कायम तयार ठेवले तर ते येतं. कारण- आपल्याला काय जन्मजात थोडंच येतं. तुम्ही एखादं वाक्य नक्कल केल्यासारखं म्हणू शकता. जसं हिंदी लोकं मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य म्हणतात. तर हे मराठी नाहीये ना, हे बसमध्ये चढताना तुम्ही काहीतरी वाचता. तसं मी काही केलं नाही. मी पहिल्या लूक टेस्टलाच एक आवाज लावला. तेव्हा सगळे खूश होते. पण ते ठरवलं होतं, की झेंडा रोवायचा. असं पुन्हा कोणी ऐकवायचं नाही की मराठी माणसाला अॅक्सेंट असतो. तुमचासुद्धा आमच्याकडे आहे.”
त्यांचा चुकीचा पंजाबी अॅक्सेंट, बिहारी लोकांचा हिंदींमधला अॅक्सेंट…
त्यावर अधिक बोलताना शुभांगी गोखलेंनी म्हटले, “कसंय की त्यांचा चुकीचा पंजाबी अॅक्सेंट, बिहारी लोकांचा हिंदींमधला अॅक्सेंट चालतो. मुख्य म्हणजे मराठी अॅक्सेंटविषयी, मराठी भाषेविषयी खूप गैरसमज आहेत. म्हणजे आता एका मोठ्या सिनेमामध्ये एक मोठा अभिनेता आहे. आवडता अभिनेता आहे; पण त्यानं आपटे नावाचं पात्र साकारलं आहे आणि तो बोलतोय काय? हे आम्ही तुमचं केलं तर? मी तर लापतागंज करताना सिंदूर व टिकली, मिश्रा आणि शुक्ला कुठलं वापरतात ते बनारसवरून मागावलेलं होतं. सिंदूर लाल किंवा केशरी -कोणत्या रंगाचा याचा आम्ही विचार करतो आणि तुम्ही आपटेला काहीही करता. आणि आपण त्यांच्या याच्यात काही केलं, तर मग ते खूप बोलून दाखवणार की नाही चुकीचे होत आहे; पण ठीक आहे आता चालवून घेतात तर चालतं”