अभिनेत्री शुभांगी गोखले(Shubhangi Gokhale) त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. आतापर्यंत त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. त्याबरोबरच ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘काहे दिया परदेस’, ‘हम हैं ना’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘लापतागंज’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा अनेक मालिकांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. आता शुभांगी गोखलेंनी एकटं राहण्याचा अनुभव काय होता, लोकांचा कसा दृष्टिकोन होता, यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.
सगळ्या गोष्टींना खूप वेळ…
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. एका पुरुषानं एकटं राहाणं आणि एका स्त्रीनं एकटं राहणं यामध्ये फरक आहे. भावनिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या बाबतीत दृष्टिकोन बदललेला असतो. त्याबद्दल काय अनुभव आहे? यावर बोलताना शुभांगी गोखले यांनी म्हटले, “माझा एकटेपणा काय आहे की, एक तर माझे वडील होते. पण एका पॉईंटला असं झालं की, सखी दूर गेली आणि माझं जवळजवळ माहेरच संपलं. म्हणजे माझे वडील गेले, आई गेली, मोठा भाऊ गेला. तेव्हा तो घरातील एकटेपणा लक्षात आला. बाहेर वावरताना हे लक्षात आलं की अजूनही तो दृष्टिकोन काहीच बदललेला नाहीये. म्हणजे मला आठवतं की ‘हीच तर प्रेमाची गंमत’च्या वेळेला शिवाजी मंदिरला सुधीर भट मला म्हणाले की, गिरगावात एक महिला मंडळ आहे. त्यांनी तुला हळदी-कुंकवाला बोलावलंय. तर इथला प्रयोग झाला की, तू जा. वाटल्यास कोणीतरी तुला घ्यायला येईल. मी ठीकेय म्हटलं. मग इंटरव्हलमध्ये मला म्हणाले की, तू जा तुझ्या घरी, तुला जायची गरज नाही वगैरे. मी का असं विचारलं. त्यावर त्यांनी असं सांगितलं की, ते म्हणालेत की नंतर कधीतरी बघू. नंतर मला जाणवलं की त्यांनी मला का नको म्हणून सांगितलं. त्यांच्या नंतर लक्षात आलं की हिला तर सौभाग्यच नाहीये. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की सगळ्या गोष्टींना खूप वेळ आहे. “
“अर्थात, बाकी माझं असणं याला आपण ज्यांच्यामध्ये वावरतो, त्यामध्ये खूप कम्फर्टेबल होतं. पण मी शक्यतो का टाळलं माहितेय का? मी ५० वर्षांची झाले, त्यानंतर बिल्डिंगमधील जे कोणी चाळकरी बंधू असतात. त्यांना हॅलो असं एवढं तरी म्हणायला लागले. नाही तर मी कोणाशी बोललेच नाही. वाण्याशीसुद्धा मी नीट बोलत नव्हते. कारण- मला माहीत होतं. मी प्राइम एजमध्ये होते. मी ३५ वर्षांची होते. आपण कितीही पुढारलेलो असलो, तरी लोकांच्या मनात येतं की ही एकटी आहे, तर बघूया का? कॉफी प्यायला येणार का, तुम्ही खूप स्वीट आहात, असे मेसेजेस किंवा निनावी फोन आणि कामामध्ये थोडीशी अडवणूक करणे. एक तर तुम्हाला रावडी बनायला लागतं. रावडी झालात ना मग सगळं सेट असतं. मग सगळे तुम्हाला घाबरून असतात. शुभांगी बाई, ताई वगैरे आहेत. तुम्हाला नॉर्मल राहण्यासाठी खूपच कणखर राहावं लागतं. कोण तुम्हाला कसं, काय गृहीत धरेल आणि काय तुमच्याबद्दल जज करेल हे काही सांगता येत नाही.
यावर अधिक बोलताना शुभांगी गोखलेंनी म्हटले की, बाहेर जेव्हा मी हिंदी मालिका करत होते तेव्हा खूप छान माणसंसुद्धा आहेत आणि कलेच्या प्रांतात त्यांनी खूप चांगली कामे केलेली आहेत. पण, हा खूप मोठा फरक आहे. आपण महाराष्ट्रात आहोत, आपण फार भाग्यवान आहोत. समानता आहे, मुंबई, पुणे आणि छोट्या गावांमध्येसुद्धा समानतेचं थोडं तरी महत्त्व आहे. पण बाहेरून येणाऱ्यांना वाटतं की, या बायका फार स्वतंत्र मनाच्या आहेत. तुम्ही घरी एकट्या काय करता वगैरे असं विचारल्यावर मी त्यांना म्हणायचे की, मी घरातील काम करते. मला माझ्या घरी करमतं. ते खूप भयानक होतं. त्यातून तुम्ही पळवाट काढू शकत नाही आणि माझ्याकडे काही कुठलं शस्त्र नाहीये ना. त्यामुळे मी नावडती आहे किंवा असू शकते. सेटवर गेल्यावर मी फक्त कलाकार असते. पण त्यांना ते सगळ्यांकडून अपेक्षित नसतं ना. त्यांना असं वाटतं की एकटी बाई आहे, एकटी राहते. त्यांना खूप उत्सुकता असते. पण, मी माझ्याभोवती तेवढा एक कोश केला की माझ्या घरामध्ये, माझ्या दैनंदीन जीवनामध्ये कोणालाही प्रवेश नाहीये. असे म्हणत बाहेरच्या जगात वावरत असताना लोकांचा दृष्टिकोन बदलल्याचे मला जाणवले नाही, असे शुभांगी गोखलेंनी म्हटले.