Shubhangi Latkar on Virat Kohli: ‘आशिकी २’, ‘बारिश’, ‘सिक्सर’, ‘माय लेक’, ‘मुसंडी’, ‘घरत गणपती’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘धर्मवीर’, ‘अबीर गुलाल’ अशा अनेक हिंदी-मराठी मालिका, जाहिराती, चित्रपटांतून शुभांगी लाटकर यांनी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी नुकतीच ‘बी रेडी ओके’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शुभांगी लाटकर यांनी विराट कोहलीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. त्याच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच विराटने त्यांच्या मुलीसाठी कोणती खास गोष्ट केली होती, यावर खुलासादेखील केला आहे.
“जेव्हा मी घरी सांगितलं…”
शुभांगी लाटकर म्हणाल्या, “मला क्रिकेटबद्दल फार माहीत नाही, कळत नाही. पण, जेव्हा मी घरी सांगितलं की मी विराट कोहलीबरोबर जाहिरातीचं शूटिंग करणार आहे, तेव्हा माझ्या मुलीला खूप आनंद झाला. ती मला म्हणाली की, आई तुला कळतंय का तू कोणाबरोबर जाहिरात करत आहेस? मी तिला म्हणाले की हो माहीत आहे, विराट कोहलीबरोबर जाहिरात करत आहे.”
“शूटिंगवेळी मी विराट कोहलीला सांगितलं की, माझी मुलगी तुझी मोठी चाहती आहे. मग मी माझ्या मुलीला फोन लावला, तर ती तेव्हा फोनवर नव्हती. मग मी सांगितलं की ती आत्ता फोनवर नाहीये, कदाचित ती कॉलेजमध्ये असावी; तर त्याने व्हॉईस नोट पाठवली. मी ती रेकॉर्ड केली आणि हे तिला पाठवा असं त्याने सांगितलं. त्याने खूप सुंदर मेसेज रेकॉर्ड केला होता. तो इतका गोड माणूस आहे, इतकं कोण करतं कोणासाठी? माझी मुलगी यशोदा वेडी व्हायची शिल्लक होती.”
शुभांगी लाटकर पुढे म्हणाल्या,”अजून एक त्या जाहिरातीची आठवण म्हणजे तो खूप प्रोफेशनल आहे. त्याला माहीत आहे की माझं मुख्य काम हे क्रिकेट खेळणं आहे, जाहिराती करणं नाहीये. खूप कमी लोकांना माहीत असतं की आपलं नक्की काम काय आहे. तसं जाहिरातीचं जग ग्लॅमरस जग आहे, पण त्याच्यात तो वाहून जात नाही, त्याला माहीत आहे की मला देवाने क्रिकेट खेळण्यासाठी निर्माण केलं आहे.”
“मला हे कशावरून वाटलं तर त्या जाहिरातीत शेवटी एक असा सीन होता, जिथे मला तो उचलतो आणि फिरतो. मी त्याच्या दृष्टीने वजनदार आहे, तर त्याने स्पष्ट सांगितलं होतं की मी यांना एकदाच फिरवणार. तुम्ही दोन-तीन कॅमेरे लावा. मी रीपिट शॉट देणार नाही. मला ते खूप आवडलं, कारण त्यांचं खरं काम क्रिकेटचं आहे; तो सीन शूट करताना दुखापत होण्याची शक्यता होती, तो भारतासाठी मॅच खेळतो.”
“तुम्ही त्यांना कलाकार म्हणून घेऊ शकत नाही, कारण त्यांचं काम मला उचलणं नाहीये, तर मला ते खूप आवडलं. मला वाटलं की, त्याला माहितेय तो नेमकं काय करण्यासाठी तिथे आलेला आहे. त्याने तो शॉट देण्यास नकार दिला नाही. त्याने तो उत्तम पद्धतीने केला, तीसुद्धा छान आठवण आहे. त्यानंतर आमचं प्रिंट शूट होतं, त्यामध्ये त्याने अक्षरश: पाच ते आठ मिनिट दिली. खूप मजा आली होती,” असे म्हणत विराट कोहलीबरोबर शूटिंगचा अनुभव अविस्मरणीय होता. तसेच, तो खूप चांगला माणूस असल्याचे वक्तव्य शुभांगी लाटकर यांनी केले आहे.