गेल्या काही दिवसांपासून दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे चांगलाच चर्चेत आहे. कारण आहे शुभंकरचं लग्न. २१ एप्रिलला शुभंकर लग्नबंधनात अडकला आणि मुंबईचा जावई झाला. अभिनेत्री अमृता बने हिच्याशी शुभंकरचं मोठ्या थाटामाटात पुण्यात लग्न झालं. साखरपुडा, व्याही भोजन, मेहंदी, हळद असे सगळे विधी पार पडल्यानंतर शुभंकर व अमृता लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर शुभंकर व अमृताचा देवदर्शन दौरा सुरू आहे; याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
शुभंकर आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. ‘धर्मवीर’, ‘चौक’ या चित्रपटात झळकल्यानंतर शुभंकर ‘सन मराठी’ वाहिनीवर ‘कन्यादान’ मालिकेत काम करत होता. याच मालिकेत शुभंकरची ओळख अमृताशी झाली. ‘कन्यादान’ मालिकेत दोघं ऑनस्क्रीन नवरा-बायको होते जे आता खऱ्या आयुष्यात झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर व अमृताचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर चार महिन्यांनी दोघं २१ एप्रिलला लग्नबंधनात अडकले.
हेही वाचा – Video: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; व्हिडीओ होतोय व्हायरल
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली झळकणार नव्या भूमिकेत! पाहा व्हिडीओ
सध्या दोघं जोड्याने देवदर्शन करत आहेत. आज (३ मे) शुभंकर व अमृताने मुंबईतल्या सिद्धिविनायक व महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. याचे फोटो शेअर करत शुभंकर म्हणाला, “अधिकृत जोडी म्हणून पहिला देवदर्शन दौरा.” शुभंकर व अमृताचे हे देवदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
दरम्यान, अश्विनी एकबोटे यांची सून देखील अभिनेत्रीचं आहे. ‘कन्यादान’ मालिके व्यतिरिक्त अमृताने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘वैजू नंबर वन’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.