‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘देवमाणूस’. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. २०२०मध्ये आलेल्या या गूढ आणि थरारक असलेल्या मालिकेने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं होतं. किरण गायकवाडने साकारलेला डॉ. अजितकुमार देव ( देवीसिंग ) खूप गाजला. स्वतःच्या फायद्यासाठी गावातल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा असा हा देवीसिंग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘देवमाणूस २’नंतर ‘देवमाणूस ३’ मालिका लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘देवमाणूस ३’ मालिकेची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री श्वेता शिंदे या मालिकेची निर्मितीची धुरा सांभाळणार आहे. अशातच श्वेताने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.
श्वेता शिंदेची ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, आता श्वेताच्या दोन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘देवमाणूस ३’ मालिकेबरोबरच श्वेताची ‘सन मराठी’ वाहिनीवर नवी मालिका प्रसारित होणार आहे. याची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे.
श्वेता शिंदेच्या नव्या मालिकेचं नाव ‘हुकूमाची राणी ही’ असं आहे. या मालिकेची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत श्वेताने लिहिलं, “आणखीन एक नवीन सुरुवात…नवी मालिका ‘हुकूमाची राणी ही’ लवकरच…आपल्या ‘सन मराठी’वर.” ‘सन मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवरही या नव्या मालिकेची पहिली झलक शेअर केली आहे. त्यामुळे आता या नव्या मालिकेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. कधीपासून सुरू होणार?, कोणती मालिका बंद होणार?, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
दरम्यान, ‘हुकूमाची राणी ही’ मालिकेची फक्त पहिलीच झलक झाली असून यामधील कलाकार गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या नव्या मालिकेत कोणते कलाकार झळकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘सन मराठी’ वाहिनीवर ‘सखा माझा पांडुरंग’ ही नवी मालिका सुरू झाली. १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता या मालिकेत संत सखूची अवीट भक्तीगाथा पाहायला मिळत आहे. या नव्या मालिकेत सखुची भूमिका बालकलाकार स्वराली खोमणेने साकारली आहे. तसंच विठ्ठलाच्या भूमिकेत ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता तेजस महाजन पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेते सुनील तावडे महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.