टीव्हीवर लागणाऱ्या रोजच्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतात. या मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार हे प्रेक्षकांच्या घरातील महत्वाचा भाग बनतात. काही कलाकार आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करतात. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘कसौटी जिंदगी की’ ही आहे. एकता कपूर दिग्दर्शित ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच श्वेता तिवारी ही आहे. आता या अभिनेत्रीने या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणते की, एकदा तलावाच्या पाण्यात शूटिंग होते आणि हे शूटिंग रात्री असायचे. सेझन खान आणि मी सुरुवातीच्या एका एपिसोडमध्ये एका सिक्वेन्ससाठी शूटिंग करत होतो. प्रसंग असा होता की मी नदीत पडते आणि मला वाचवण्यासाठी सेझनदेखील पाण्यात उडी मारतो. कथानक पुढे जाण्यासाठी आम्हाला रात्रभर पाण्यात राहणे गरजेचे होते. त्यामुळे त्या पाण्यातून आम्ही सकाळीच बाहेर पडायचो. सकाळी शूटिंग संपल्यानंतर तलावातून बाहेर पडताना तलावाच्या काठावर लहान मुलांना मलविसर्जन करताना पाहिले इतकेच नाही तर मी तिथून एक साप जाताना पाहिला आणि मला याची जाणीव झाली की साप असलेल्या तलावात ती आणि तिचा सहकलाकार रात्रभर होते. अशी अंगावर काटा आठवण अभिनेत्रीने सांगितली आहे.

हेही वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि पत्नी उपासनाने ‘डान्सर्स युनियन’च्या पाचशेहून अधिक सदस्यांना प्रदान केला आरोग्य विमा

याआधी ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेची दिग्दर्शक एकता कपूरने श्वेता तिवारीची या मालिकेसाठी कशी निवड झाली याबदद्ल सांगितले होते. तिने म्हटले होते की, मी श्वेताला दूरदर्शनच्या एका मालिकेत पाहिले होते. ती मुख्य भूमिकेत नव्हती आणि एका सीनमध्ये खूप मागे उभी होती. पण तिच्याकडे असं काहीतरी होतं, ज्यामुळे मला वाटलं ती माझ्या मालिकेसाठी योग्य आहे. मी माझ्या टीमला तिच्यापर्यंत पोहोचायला सांगितलं. सेझनच्या बाबतीत बोलायचे तर तो आमच्यासाठी आधीच एक शो करत होता आणि ते दोघे आमच्या मालिकेसाठी पूर्णपणे योग्य असल्याचे लक्षात आल्याचे असे एकता कपूरने म्हटले आहे. या मालिकेची लोकप्रियता मोठी होती. २०१८ मध्ये या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता मात्र श्वेता तिवारीची भूमिका असलेल्या पहिल्या भागाची बरोबरी करु शकला नाही.

दरम्यान, अभिनेत्री श्वेता तिवारी या मालिकेशिवाय बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. याबरोबरच, खतरों के खिलाडी, झलक दिखला जा आणि नच बलिए अशा कार्यक्रमांतून देखील तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.