Ata Hou De Dhingana Siddharth Jadhav : स्टार प्रवाह चॅनेलवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Ata Hou De Dhingana) हा शो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) अनोख्या सूत्रसंचलनामुळे या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळताना दिसते. अशातच या शोबद्दल सिद्धार्थने नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. अतुल परचुरेंच्या कॅचअप पॉडकस्टमध्ये सिद्धार्थने ‘आता होऊ धिंगाणा’ शोविषयी, स्टार प्रवाह चॅनेलविषयी आणि चॅनेल हेड सतीश राजवाडेंविषयी (Satish Rajwade) त्याचं मत व्यक्त केलं आहे. आजारपणात स्टार प्रवाह चॅनेल व सतीश राजवाडे यांनी केलेल्या मदतीविषयीही सिद्धार्थने भाष्य केलं आहे.

याबद्दल बोलताना सिद्धार्थ असं म्हणाला की “एक किस्सा आहे. मी सतीश राजवाडेंना सांगितलं होतं की, मला टेलीव्हिजन करायचं आहे आणि मला शोच करायचा होता. त्यानंतर एकदिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की, एक शो आहे. मग माझ्यासाठी तो शो डिझाईन झाला. यानिमित्ताने मला स्टार प्रवाह चॅनेल आणि सतीश सरांचे आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी माझ्यासाठी संपूर्ण शो डिझाईन केला. त्याचं प्रोमो शूट होणार होतं. पण त्यादरम्यान ‘दे धक्का २’चं प्रमोशन सुरू होतं. तर मी बोटीवर वगैरे शूट करत होतो आणि त्याचदिवशी माझी हालत इतकी बेकार झाली की, मी हिंदुजामध्ये अ‍ॅडमिट झालो. म्हणजे पुढच्या दिवशी शोच्या प्रोमोचं शूट होतं आणि आदल्या दिवशी मी अ‍ॅडमिट झालो होतो.”

यापुढे सिद्धार्थने असं म्हटलं की, “त्यानंतर मी सतीश सरांना थेट व्हिडीओ कॉल केला आणि सगळं सांगितलं. त्यावर त्या माणसाचं हे वाक्य होतं की, “सिद्ध्या मला शो नाही तू महत्त्वाचा आहेस”. शो आता ऑन एअर नाही गेला तरी चालेल. तू बरा होऊन ये मग आपण शो करु. तेव्हा ते चॅनेलचे हेड होते. पण याचा विचार न करता त्यांनी मला फक्त तू बरं होऊन ये मग आपण शो करु असं म्हटलं. नाही तर आतापर्यंत तुम्ही असं नका करु. तुम्ही या. सगळं बुक झालं आहे असं सांगितलं जातं. पण हा अनुभव माझ्यासाठी वेगळा होता”.

पुढे त्याने सांगितलं की, “त्यादरम्यान माझं एक ऑपरेशन झालं आणि मी बराही झालो. मग शोसाठी सेटवर जायला तयार झालो. तर त्यांनी माझ्यासाठी सेटवर डॉक्टरही ठेवले होते आणि मला आराम म्हणून माझ्या जाण्या-येण्याचीही सोय केली गेली होती. त्यामुळे धिंगाणा शोचा पहिला सीझन आणि स्टार प्रवाह चॅनेल सुपरहिट होण्याचं हेच कारण आहे की, ते त्यांच्या नटाला जपतात आणि हा किस्सा मी कधीच विसरू शकत नाही”.

तसंच त्याने पुढे “आता होऊ दे धिंगाणामुळे आयुष्याला वेग आला. स्टार प्रवाहसारखं चॅनेल आयुष्यात आलं आणि सतीश राजवाडेंसारखा दुरदृश्टी असलेला माणूस, मित्र आला. ज्याने सांगितलं की तू हे कर. त्यांनी मला माझ्या मनासारखं काम करण्याची मुभा दिली. चाकोरीबद्ध निवेदन किंवा सूत्रसंचालन असतं ते सोडून तुला वाटतं ते तू कर हे त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की त्या शोमुळे अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. अनेक मोठमोठे कलाकार त्या मंचावर आले. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. मी खूपदा म्हणतो की, मी किती चांगला नट आहे मला माहीत नाही पण मी नशीबवान नट नक्की आहे”.

Story img Loader