इंडियन आयडलचे पहिले पर्व मराठमोळा गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. यानंतर अभिजीतचे आयुष्य रातोरात बदलले. सध्या अभिजीत सावंत हा लाइमलाइटपासून दूर आहे. नुकतंच अभिजीत सावंतने सिनेसृष्टीत येण्यासाठी गॉडफादर असण्याबद्दलचे भाष्य केले आहे.
अभिजीत सावंतने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सिनेसृष्टीत येण्यासाठी गॉडफादर असण्याची गरज आहे का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिले. “तुम्हाला सिनेसृष्टीत गॉडफादरची आवश्यकता निश्चित असते”, असे तो यावेळी म्हणाला.
आणखी वाचा : “मतांची फेरफार, पैशांची देवाण अन्…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा ‘त्या’ अफवेबद्दल खुलासा, म्हणाला “माझी परिस्थिती…”
“मी सिनेसृष्टीत इतका काळ घालवल्यानंतर आता मला वाटतं की, तुम्हाला काम करण्यासाठी गॉडफादरची आवश्यकता असते. तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची निश्चितच गरज असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती लागते, जी तुम्हाला योग्य मार्गावर चालायला शिकवेल”, असे अभिजीतने म्हटले.
“कारण सिनेसृष्टीत तुम्ही जेव्हा धडपडता, जेव्हा तुम्हाला अपयश येतं, त्यानंतरच तुम्ही शिकता. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकता. त्यावर तुम्ही योग्य ती मेहनत घेता. पण गाण्यांचं क्षेत्र हे पूर्णपणे सिनेसृष्टीच्या आधारावर उभं आहे. इथे तुमच्या चुकांसाठी जास्त वेळ नसतो. कारण अनेक लोक त्यात काम करत आहेत. त्यामुळे सर्वांनाच जे चांगले काम करतात, ज्यांना सतत यश मिळतं, तीच लोक हवी असतात. सिनेसृष्टीतील लोक यांसारख्या कलाकारांनाच काम देतात”, असेही त्याने सांगितले.
“त्यामुळे तुम्हाला सिनेसृष्टीत गॉडफादरची आवश्यकता निश्चित असते, जेणेकरुन तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला त्याचा फायदा होतोय किंवा एखादा प्लॅटफॉर्म देत असेल, तर ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देणारी माणसं नक्कीच आवश्यक असतात”, असेही अभिजीत सावंतने स्पष्टपणे सांगितले.