Kartiki Gaikwad Baby Boy : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडच्या घरी गेल्यावर्षी मे महिन्यात नव्या सदस्याचं आगमन झालं. कार्तिकीने १४ मे रोजी पोस्ट शेअर करत तिला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती.

तेव्हापासून कार्तिकी तिच्या लाडक्या लेकाचं नाव काय ठेवणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर युट्यूब व्हिडीओ शेअर करत कार्तिकीने लेकासाठी एक खास गाणं प्रदर्शित करून त्याचा चेहरा रिव्हिल केला आहे.

कार्तिकीने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत, “अखेर प्रतीक्षा संपली… ‘अंगाई-नीज बाळा’ गाणं प्रदर्शित झालं असून… आम्ही यात आमच्या बाळाचा चेहरा रिव्हिल केला आहे.” असं तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. तसेच या स्टोरीमध्ये गायिकेने युट्यूबची लिंक देखील दिली आहे.

कार्तिकीने तिच्या लाडक्या लेकासाठी खास ‘अंगाई-नीज बाळा’ हे गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याची गीतकार, संगीतकार आणि गायिका कार्तिकी गायकवाड स्वत: आहे. तर, या गाण्याची निर्मिती तिच्या वडिलांनी म्हणजेच कल्याणजी गायकवाड यांनी केली आहे. या गाण्यात कार्तिकी, तिचा पती रोनित पिसे आणि तिच्या चिमुकल्या लेकाची झलक पाहायला मिळत आहे.

Kartiki Gaikwad Baby Boy
कार्तिकी गायकवाडच्या मुलाचं नाव काय? ( Kartiki Gaikwad Baby Boy )

कार्तिकी गायकवाडने बाळाचं नाव काय ठेवलं?

कार्तिकीने तिच्या बाळाचं नाव रिशांक असं ठेवलं आहे. अंगाई गाण्याच्या व्हिडीओच्या सुरुवातीला Introducing ‘रिशांक कार्तिकी रोनित पिसे’ असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या लेकाचं नाव आणि त्याची पहिली झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. गायिकेच्या चाहत्यांनी रिशांकची पहिली झलक पाहिल्यावर या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कार्तिकी गायकवाड ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून तिला ओळखलं जातं. मराठी मनोरंजनसृष्टीतील असंख्य गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे. वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. गेल्यावर्षी लग्नानंतर चार वर्षांनी कार्तिकी आई झाली. यंदा कार्तिकी रिशांकचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.