‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. सध्या तिला सातवा महिना असून मे महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या डोहाळे जेवणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अशातच सध्या कार्तिकीचा डोहाळे जेवणाचा एक युट्यूब व्हिडीओ चर्चेत आला आहे.
‘समर्था खेसे (Madhuri Khese)’ या युट्यूब चॅनलवर कार्तिकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत कार्तिकीचा डोहाळे जेवणासाठी केलेला खास मेकअप, ओटभरणीपूर्वी ती काय म्हणाली?, तिला मुलगा हवी की मुलगी?, शिवाय येणाऱ्या बाळाकडून काय अपेक्षा आहे? याविषयी तिने सांगितलं.
कार्तिकी म्हणाली, “आज माझा ओटीभरण्याचा कार्यक्रम आहे. आजच्या खूप वेगळ्या भावना आहेत. कारण आतापर्यंत आयुष्यामध्ये अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. अगदी बालपणापासून ते संगीत क्षेत्रामधील आवड. बाबा स्वतः माझे गुरू असल्यामुळे लहानपणापासून गाण्याची आवड आणि त्याच क्षेत्रामध्ये वाटचाल. म्हणजे अगदी बाबांबरोबर कार्यक्रमाला जाण्यापासून ते ‘सारेगमप’चं पर्व. एक लहान कार्तिकी महाराष्ट्रासह जगभरातल्या रसिक प्रेक्षकांसमोर आली. आपण उदंड आशीर्वाद, प्रेम दिलं. त्यानंतर मग लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नव्हता. पण २०२०मध्ये माझं रोनित पिसे यांच्याशी लग्न झालं आणि त्यानंतर आता एका वेगळ्या, नव्या भूमिकेत म्हणजे आईच्या भूमिकेत जातेय. ही खूप वेगळी भावना आहे. एक जबाबदारी वाटतेय. त्याचबरोबर आनंदीही खूप सारा आहे.”
“असं म्हणतात की, स्त्रीचा हा दुसरा जन्म असतो. तर अगदी खरं तसंच होणार आहे मला वाटतंय. जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा आईच महत्त्व अधिक कळतं. त्यामुळे ही एक वेगळी भूमिका असणार आहे. माऊली चरणी, देवा चरणी हीच प्रार्थना की, बाळाला त्यांनी खूप सुखी, समाधानी आयुष्य द्यावं आणि बाळाचं आरोग्य उत्तम राहो. बाळाच्या येण्याने आमच्या परिवारात प्रचंड आनंद झालेला आहे. बाळ आल्यानंतर तो आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद असेच आमच्या परिवाराच्या पाठीशी राहू द्या. नवीन सदस्य आमच्या परिवारात येतोय तर त्याच्यावर किंवा तिच्यावर सुद्धा राहू द्या.”
पुढे कार्तिकीला विचारलं गेलं की, मुलगा हवा की मुलगी? तर यावर गायिका म्हणाली, “खरंतर मी असा काहीच विचार केला नाहीये की, मुलगा हवा की मुलगी. जे कुणी होईल मुलगा किंवा मुलगी त्या बाळाचं आरोग्य उत्तम असावं आणि त्या बाळाकडून घरातल्यांची, मोठ्यांची, देशाची, धर्माची सगळ्यांची सेवा होवो. बाळ सुसंस्कृत होवो. आमच्यापरीने आम्ही त्याला किंवा तिला खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू आणि मुलगा होणार की मुलगी यापेक्षा ते जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल. जे कोणी येईल त्यांनी जी गाण्याची परंपरा आहे ती कायम ठेवावी अशी माझी इच्छा आहे. पण हे मी लादणार नाही. जी काही आवड असेल त्यानुसार मी सर्व करेन.”