केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज वाढदिवस आहे. राजकारणात येण्याआधी स्मृती इराणी या अभिनेत्री होत्या. मालिकांमध्ये काम करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आता त्या देशाच्या महिला व बालविकास मंत्री आहेत.
स्मृती इराणी यांचा जन्म २३ मार्च १९७६ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांचे वडील पंजाब तर आई आसामची आहे. स्मृती इराणी यांचे वडील कुरिअर कंपनीत कामाला होते. घरची परिस्थिती पाहून स्मृती इराणी यांनी शालेय जीवनानंतर बीकॉमची पदवी मिळवण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश न घेता बाहेरुन परिक्षा देण्यासाठी अर्ज भरला होता. परंतु, त्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.
हेही वाचा>> “१०-२० वर्ष ब्रेक घे” नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले “रिमेक…”
घरातील आर्थिक परिस्थितीला हातभर लावण्यासाठी स्मृती इराणी यांनी एकेकाळी वेटरची नोकरीही केली आहे. त्यानंतर काही काळ सौंदर्य प्रसाधने विकण्याचं कामही त्यांनी केलं. १९९८मध्ये स्मृती इराणींनी मिस इंडियासाठी ऑडिशन दिलं होतं. परंतु, त्यांच्या वडिलांचा याला विरोध होता. आईने पाठिंबा दिल्यानंतर इराणींनी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन फिनाले पर्यंत बाजी मारली. परंतु, मिस इंडियाचा खिताब त्या जिंकू शकल्या नाहीत. स्मृती इराणींनी अनेक ऑडिशन दिल्यानंतर २००० साली एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू भी’ या मालिकेत त्यांना ब्रेक मिळाला आणि त्यांचं नशीब उजळलं. या मालिकेत तुलसी हे पात्र साकारुन त्या घराघरात पोहोचल्या.
मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर २००३ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना भाजपाच्या महिला विंगचं उपाध्यक्ष पद देण्यात आलं. २०१० साली त्या भाजपा महिला विंगच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून तिकीट मिळालं. अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात त्या उभ्या राहिल्या होत्या. परंतु, या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकीट मिळालं. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी राहुल गांधींचा पराभव केला. आता त्या देशाच्या महिला व बालविकास मंत्री आहेत.