कलाविश्वात सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच के.एल.राहुल व अथिया शेट्टीने लग्नगाठ बांधली. त्यानंतर कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली. आता अभिनेत्री म्हणून ठसा उमटवलेल्या व सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांच्या घरीही लगीनघाई सुरू आहे. स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनैल इराणी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
शनैल इराणी अर्जुन भल्लासह लग्नगाठ बांधणार आहे. २०२१मध्ये शनैल व अर्जुनचा साखरपुडा पार पडला होता. स्मृती इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. आता त्या लवकरच सासू होणार असून लेकीच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. स्मृती इराणी यांची लेक शनैल ही पेशाने वकील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्मृती इराणींचा होणारा अर्जुन भल्लाने एमबीए केलं असून त्याच्याकडे वकिलाची डिग्रीही आहे. अर्जुन त्याच्या कुटुंबियांसह कॅनडा येथे वास्तव्यास आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, अर्जुन त्याच्या कामामुळे ‘अॅपल’ या कंपनीशीही जोडला गेला आहे.
शनैल व अर्जुन ९ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत.राजस्थानमधील ५०० वर्षे जुन्या खींवसर किल्ल्यावर ते विवाहबद्ध होणार आहेत.खींवसर फोर्टमध्येच अर्जुनने शनैलला लग्नाची मागणी घातली होती. आता याच ठिकाणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये खींवसर किल्ला आहे.
हेही वाचा>>टर्कीतील भूकंपात हजारो बळी, बॉलिवूडकरही हळहळले; फोटो शेअर करत आलिया भट्ट म्हणाली…
शनैल व अर्जुन लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून शाही विवाहसोहळ्यासाठी पॅलेसवरील ७१ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. अगदी शाही पद्धतीने स्मृती इराणींच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडणार आहे.