आदेश बांदेकर हे मराठी कलाविश्वातील आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरांत पोहोचले आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी झाले. अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करून काही वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. परंतु, पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. अशा कठीण प्रसंगात आदेश बांदेकरांना ठाकरे कुटुंबीयांनी मोठी मदत केली होती असं त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं. याशिवाय निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांचा मुलगा सोहम बांदेकर त्यांना काय म्हणाला होता? याविषयी सुद्धा त्यांनी खुलासा केला आहे.
हेही वाचा : हळदी समारंभात भावुक झाली होती कियारा अडवाणी, प्रसिद्ध संगीतकाराचा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबद्दल खुलासा
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने २० व्या वर्षात पदार्पण केल्याने अलीकडेच आदेश बांदेकर यांनी ‘मुंबई तक’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास, निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर घरच्यांची प्रतिक्रिया याविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “निवडणुकीच्या निकालानंतर साहेबांनी मला जवळ घेतलं आणि स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे सावरलं. निवडणुकीत मी आकड्यांच्या गणितात पडलो हे मान्य होतं मला पण, ज्या ३३ ते ३५ हजार लोकांनी मला मतं दिली होती. त्यांचं मत कधीही फुकट जाणार नाही असं मी इथून पुढे काम करेन असं मी तेव्हाच ठरवलं होतं.”
हेही वाचा : “‘त्या’ घटनेनंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं”, आदेश बांदेकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाले, “सुचित्राला…”
आदेश बांदेकर पुढे म्हणाले, “निकालानंतर मी माझ्या घरी पवईला जायला निघालो. आमचं कुटुंब हे अतिशय मध्यमवर्गीय आहे. प्रत्येकजण जणू काहीच घडलं नाहीये असं वागत होता. सगळ्या टीव्ही चॅनेलवर महाराष्ट्राचे भावोजी पडले ही ब्रेकिंग सुरु होती. तरीही माझ्या घरचे काही झालंच नाही अशाप्रकारे ते माझ्यासमोर वावरत होते. घरी गेल्यावर सोहम समोर उभा होता…अर्थात तेव्हा तो लहान होता. मी घरी पोहोचण्याच्या आधी तो रडलाय हे मला कळालं होतं. त्याला फेस कसं करू…ही गोष्ट मनात सुरु असताना सोहम माझ्याजवळ आला आणि त्याने पटकन माझ्या हातावर टाळी दिली. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही.”
“माझ्या हातावर टाळी देत सोहम मला म्हणाला, बाबा काळजी करू नको हा…सचिन तेंडुलकर पहिल्या मॅचला झिरोवरचं आऊट झाला होता. त्याच्या त्या वाक्याने मला एक वेगळी उभारी मिळाली. त्या क्षणाला मी पुन्हा ठरवलं, समाजकारणाचा हा रस्ता आहे आणि आपण आपलं काम सुरु ठेवायचं. त्यामुळे एवढी वर्ष मी उद्धव साहेबांबरोबर अत्यंत प्रामाणिकपणे काम करतोय आणि ते काम असंच सुरु राहणार”, असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं.