‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून अभिनेत्री सोनालिका जोशी(Sonalika Joshi) ही माधवी भाभी या पात्रातून घराघरांत पोहोचली. आत्माराम तुकाराम भिडे व माधवी भिडे हे या या मालिकेआधी अभिनेत्रीने अनेक मराठी मालिकांत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिचा अभिनयक्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला, यावर वक्तव्य केले आहे.
जितकं आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला…
सोनालिका जोशीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी बोलताना सोनालिका जोशी म्हणाली, “मी पहिलं हिंदी नाटक केलं. ‘सराय की मालकिन’ या हिंदी नाटकात काम केलं. आमच्या शेजारी राधाकृष्णन दत्त म्हणून एक अभिनेता राहायचा. त्यांना मला त्या नाटकात काम करशील का, असं विचारलं. मग मी गेले आणि मला ते नाटक मिळालं. असं काम मिळत गेलं. ‘उडन छू’ या हिंदी सिरियलद्वारे मी पहिल्यांदा कॅमेरासमोर आले. पहिलं मराठी व्यावसायिक नाटक हे कुणासाठी कोणीतरी यामध्ये काम केलं. त्यातून पहिलं विशेष लक्षवेधी अभिनेत्री हे नॉमिनेशन मिळालं. तेही रसिका जोशी आणि निर्मिती सावंत यांच्याबरोबर मिळालं होतं. इंडस्ट्रीमध्ये आल्यावर लगेच १९९१-९२ साली हे मिळालं. मी काम करत गेले. तेव्हा असं झालं की त्यावेळी खूप चॅनेल्स लॉन्च झाले. त्यामुळे काम करायला कमी नव्हती.”
“मी मराठी ३५ मालिका केल्या असतील. सूत्रसंचालनही केलं आहे. ईटीव्ही मराठी, स्टार मराठी, प्रभात, मी मराठी असे खूप चॅनेल्स होते. अनेक मालिकांत आम्ही काम केले.आम्ही काम केलेल्या पाच-पाच मालिका एका वेळेला टीव्हीवर असायच्या. एका लाईनमध्ये मालिका स्लॉटमध्ये असायच्या. तेव्हा महाश्वेता नावाची मालिका तर दूरदर्शनवर होती. जितकं आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला लोकांचं प्रेम मिळतं तितकंच प्रेम त्या मालिकेला लोकांचं प्रेम मिळायचं.अरूणा जोगळेकर आणि महेश सातोसकरांनी ते जे काही बनवलं होतं ते खूप सुंदर होतं. म्हणजे आम्ही १७ मिनिटांचा एक शॉट केला होता. तो वन शॉटमध्ये शूटिंग केलं होतं.”
“‘महाश्वेता’मध्ये सुलभा देशपांडे, रवी पटवर्धन, आनंद अभ्यंकर, शरद पोंक्षे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, प्रसाद ओक, मी आणि सोनाली पंडित अशी सगळी स्टारकास्ट होती. आता हे सगळे मोठ्या लेव्हलवर काम करत आहेत. ते ग्रेट आहेत. काय सुंदर कामं करतात. ऐश्वर्याने नुकतीच खलनायिकेची भूमिका केली आहे. तिच्यात इतका गोडवा आहे. तिने इतके गावागावात जाऊन चित्रपट केले आहेत. तिच्यात खूप गोडवा आहे. पण तिने ती इमेज ब्रेक करून तिने आता खलनायिकेची भूमिका साकारली होती. इतकी सुंदर भूमिका साकारली. आम्ही सगळ्या कलाकारांनी खूप मजा केली. जसं त्या मालिकेला खूप प्रेम मिळालं तसं आता मी तारक मेहताचं बघते. त्यानंतर किमयागार, आकाश पेलताना, एका श्वासाचं अंतर अशा खूप मराठी मालिकांत काम केले. हे सगळे कलाकार होते.शरद कधी माझ्या भावाची भूमिका साकारत असे, तर कधी बॉयफ्रेंडची भूमिका साकारत असे. कधी शैलेश माझा भाऊ तर कधी बॉयफ्रेंड असं असायचं. आजही या कलाकारांबरोबर तशी मैत्री आहे. शैलेशमुळे मला तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मिळाली”, अशी आठवण सोनालिका जोशीने सांगितली.
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.