Sourav Ganguly : क्रिकेटच्या जगात आपल्या दमदार खेळीसाठी आणि समलोचनासाठी ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे सौरव गांगुली. खेळाच्या मैदानावर दमदार खेळी करणारा सौरव मनोरंजनाच्या क्षेत्रातही तितकाच रमताना दिसतो. ‘दादागिरी’ नावाच्या बंगाली शोमुळे हा क्रिकेटपटू घराघरात पोहोचला. सौरवचा ‘दादागिरी’ शो चांगलाच लोकप्रिय झाला होता. स्टेडियम आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं कौशल्य दाखवल्यानंतर सौरव आता पुन्हा मोठ्या नॉन-फिक्शन शोसह मनोरंजनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे.
सौरव गांगुली करणार ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन
इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, सौरव गांगुली ‘बिग बॉस बांगला’ आणि आणखी एक प्रश्नोत्तरांचा नवीन शो करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या आगामी शोचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. दोन्ही शो जुलै २०२५ पासून सुरू होतील असे वृत्त आहे. सौरवमुळे आता ‘बिग बॉस बांगला’मध्ये नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. यासाठी सौरवने १२५ कोटींचा करार केला असल्याचेही वृत्त आहे. सौरव गांगुली आणि स्टार जलसा यांच्यात चार वर्षांसाठी हा करार झाला आहे.
“माझ्यासाठी ही एक नवीन इनिंग आहे, ती खेळण्यास मी तयार”
याबद्दल सौरवने त्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “स्टार जलशाशी जोडल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. टीव्ही माध्यमाने मला लोकांशी जोडण्याचा एक खास मार्ग दिला आहे. आता आपण नॉन-फिक्शन शोद्वारे कथाकथनाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत. त्यामुळे मनोरंजन आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टींचा आनंद घेणारे कार्यक्रम करण्यास मी खूपच उत्सुक आहे. माझ्यासाठी ही एक नवीन इनिंग आहे आणि मी खेळाप्रमाणे त्याच जोशाने ती खेळण्यास तयार आहे.”
“क्रिकेटनंतरच्या प्रवासात आलेले ‘हे’ एक मोठे वळण”
यापुढे सौरवने असं म्हटलं की, “क्रिकेटच्या मैदानाबाहेरील अधिक लोकांशी जोडला जाणार असल्याचा मला आनंद आहे आणि टीव्ही माध्यम मला हे करण्याची नवीन संधी देत आहे. त्यामुळे निश्चितच मी यासाठी खूप आनंदी आणि उत्सुक आहे. आयुष्यात क्रिकेटनंतरच्या प्रवासात आलेले हे एक मोठे वळण आहे.” दरम्यान, मैदानावर मार्गदर्शक म्हणून नेतृत्व करणारा सौरव आता पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
सौरव गांगुलीच्या ‘बिग बॉस’ बांगलाची चाहत्यांना उत्सुकता
‘बिग बॉस’ हा शो टेलिव्हिजनवरील काही लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी आहे. हा शो प्रत्येक भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि या शोला चाहत्यांकडूनही तितकाच प्रतिसाद मिळतो. हिंदीमधील ‘बिग बॉस’च्या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. अशातच आता बांगलामधील ‘बिग बॉस’च्या शोचे सूत्रसंचालन सौरव करणार आहे. त्यामुळे साहजिकच त्याला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते उत्सुक आहेत.