‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावतात. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा कार्यक्रम आवडीने बघते. नुकतंच आध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास यांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली. या शोमधील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांनी सगळ्यांशी गप्पा मारल्या. याबरोबरच या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांच्या कित्येक शंकांचं निरसन केलं. कित्येकांचं मौलिक मार्गदर्शन गौर गोपाल दास यांनी केलं. दरम्यान भाऊ कदम यांनी त्यांना त्यांचं चहाचं व्यसन सोडायचं आहे त्यासाठी काय करावं? हा प्रश्न विचारल्यावर गौर गोपाल दास यांनी एक उदाहरण देत व्यसन किंवा एखादी वाईट सवय कशी सोडावी याबद्दल मार्गदर्शन केलं.
आणखी वाचा : “सध्या अत्यंत वाईट ऑफर्स…” बॉलिवूडमध्ये काम न करण्याबद्दल डिनो मोरियाचा खुलासा
भाऊ कदम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गौर गोपाल दास म्हणाले, “माझा एक मित्र आहे, जो माझ्या लेक्चरला यायचा. एक दिवस तो माझ्याकडे आला अन् म्हणाला की “मला सिगारेट सोडायची आहे, काय करू?” यावर मी त्याला विचारलं की तो नेमक्या किती सिगारेट पितो, त्याने सांगितलं की तो ६४ सिगारेट दिवसाला पितो. यावर मी त्याला म्हंटलं की अजिबात सिगारेट सोडू नकोस, यावर तो गोंधळला. मी त्याला म्हणालो की तू ६४ सिगारेट ओढतोस ना, त्यातल्या फक्त २ कमी कर,आठवडा भर बघ कसं वाटतंय, आणि त्यानंतर आणखी २ कमी कर. असं ६४ सिगारेटवरुन शून्यावर येणं कठीण आहे. असं करत करत ६४ सिगारेट ओढणारा आज शून्य सिगारेटवर आला आहे. हेच जर त्याला लगेच संपूर्ण व्यसन सोडायला सांगितलं असतं तर ते शक्य झालं नसतं.”
गौर गोपाल दास यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. येत्या सोमवार आणि मंगळवारी गौर गोपाल दास यांचाहा एपिसोड झी मराठीवर पाहता येणार आहे. गौर गोपाल दास हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रेरणा देणाऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.