स्पृहा जोशीला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. स्पृहाने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्टी’, ‘उंच माझा झोका’ या मालिका आणि ‘सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमामुळे स्पृहा जोशी घराघरांत पोहोचली. नुकतीच अभिनेत्रीने सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी स्पृहाने कलाविश्वात कसे पदार्पण केले? त्यापूर्वी करिअर म्हणून ती काय करणार होती याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा : “मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली तर?”, प्रिया बापट प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, “सर्वात आधी मुंबईचे…”
स्पृहा म्हणाली, “शाळेत मी प्रचंड हुशार होते त्यामुळे अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या आई-वडिलांना सुरुवातीला थोडा धक्का बसला पण, त्यांनी मला प्रचंड सहकार्य केले. माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. मी कॉलेजनंतर लगेच युपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. क्लासेस सुद्धा लावले होते तेव्हाच मला शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर आनंद इंगळे दादा भेटला. त्यांची टीम तेव्हा गाजलेल्या नाटकांचे २५ प्रयोग करत होती. परीक्षेमुळे मी आधीच नकार कळवला होता. पण, आनंद दादा भेटल्यावर मला त्याला नाही बोलता आले नाही आणि मी नाटकाची तालीम सुरु होती त्याठिकाणी गेले.”
हेही वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रुझ झाली आई, गोंडस बाळाचा पहिला फोटो आला समोर, नावही आहे खास
स्पृहा पुढे म्हणाली, “तालीम सुरु असताना दिग्दर्शक मंगेश कदम यांनी मला एक सीन वाचायला दिला…मी तो वाचला आणि मंगेश काका म्हणाले ठिके आता उद्यापासून तालीम करायला ये. त्यांना मला हो किंवा नाही काहीच बोलता आले नाही. बाबांनी सुद्धा २५ प्रयोगासाठी परवानगी दिली आणि माझे आयुष्य बदलले.”
स्पृहाने पुढे सांगितले, “२५ प्रयोग करत असताना मनात कुठेतरी विचार आला. आपल्याला यामध्ये मजा येत आहे. या २५ प्रयोगांनी माझ्या आयुष्याला नवे वळण दिले. कॅमेरा, लोकांसमोर काम करून आपण आनंदी असतो याची जाणीव मला झाली आणि मी घरच्यांशी यासंदर्भात बोलण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी माझ्या बाबांना मेल लिहिला होता. कारण, मी युपीएससीचा फॉर्म भरायला सुद्धा विसरले होते. तेव्हा फक्त २० वर्षांची असल्याने मी बाबांकडून सहा महिने मागितले आणि या दिवसात माझ्याकडून काहीच नाही झाले तर पुन्हा अभ्यास करेन असे मी त्यांना सांगितले.”
हेही वाचा : नाटय़रंग: ‘नात्याची गोष्ट’; घटस्फोटितांच्या मुलांचं आर्त विश्व
“सहा महिन्यांत मला ‘मोरया’ चित्रपट, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका मिळाली. त्यानंतर मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.” असे स्पृहा म्हणाली.