‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘लोकमान्य’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा एकापेक्षा एक जबरदस्त मालिकांमध्ये स्पृहा जोशीने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नाटक असो किंवा मालिका स्पृहाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता लवकरच अभिनेत्री एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘सुख कळले’ ही मालिका सुरू होणार आहे. यामध्ये स्पृहाबरोबर अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेद्वारे सगळ्यांना माधव-मिथिलाच्या सुखी संसाराची गोष्ट अनुभवता येणार आहे. माधव-मिथिला या दोघांचं सुख नेमकं कशात आहे हे सांगणारी गोड मालिका म्हणजे ‘सुख कळले!’

हेही वाचा : आलियाच्या बहिणींनी लग्नात पळवले होते रणबीर कपूरचे शूज; शेवटी मेहुणीबरोबर ‘अशी’ केली मांडवली

स्पृहाच्या मालिकेच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. सेटवरच्या शूटिंगचा पहिल्या दिवसाचा व्हिडीओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. घरातून सकाळी ७.३० पासून सुरू झालेला दिवस, त्यानंतर सेटवरचं शूटिंग ते थेट रात्री ११.३० वाजता घेतलेली विश्रांती याची झलक अभिनेत्रीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओला तिने “शूटच्या पहिल्या दिवसाची छोटीशी झलक” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : सुबोध भावेचा आवाज अन् रणदीप-अंकिता…; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर अमृता खानविलकरची पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, स्पृहाने शेअर केलेल्या व्हिडीओवर सुव्रत जोशी, सोहम बांदेकर, नंदिता पाटकर, अवधुत गुप्ते, संग्राम समेळ, सुरुद गोडबोले यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. येत्या २२ एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी कलर्सवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader