अभिनेत्री स्पृहा जोशीने चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. स्पृहाला छोट्या पडद्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. याशिवाय स्पृहाचे स्वत:चे युट्यूब चॅनेलही आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पृहाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
हेही वाचा : “अवघ्या २ दिवसांत…”, ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
‘अमुक तमूक’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पृहा जोशी म्हणाली, “घरात काहीच काम न करता मी एकटी बसू शकत नाही. माझ्या डोक्याला सतत काहीतरी खाद्य लागतं. दिवसभरात मी स्वत:साठी वेगवेगळी कामं शोधत असते. घरी काहीच कामं नसतील तर मी झोपून राहते.”
हेही वाचा : “२०० टेक, पॅनिक अटॅक अन्…”, ‘रॉकी और रानी’ फेम अभिनेत्रीने सांगितली ऑडिशनची आठवण; म्हणाली, “खूप रडले…”
स्पृहा पुढे म्हणाली, “मी मानसिक पुणेकर आहे. काहीच काम नसेल तर मी झोपून जाते. दररोज दुपारी २ ते ४ मी बंद असते… नो एण्ट्री आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवाच्या दयेने मला दुपारच्या वेळी कोणत्याही जागेत झोप येते. गाडीत वगैरे कुठेही मी छान झोपू शकते. माझे मित्र-मैत्रिणी माझ्याबरोबर असतील तरीही मला कुठेही झोप लागते.”
स्वत:च्या वैयक्तिक युट्यूब चॅनेलबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये पहिले सहा महिने लोकांकडे काहीच काम नव्हते. हळूहळू मला कंटाळा येऊ लागला. त्यात मला कवितांची प्रचंड आवड असल्याने मी युट्यूब चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी माझे सबस्क्रायबर्स सुद्धा वाढले. खजिना सीरिज, पुस्तकांचे रिव्ह्यूज, जगाच्या पाठीवर या सीरिजमुळे संपूर्ण युट्यूबची प्रोसेस मला कळाली आणि आता माझे १ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.” दरम्यान, या चॅनेलवर विविध कविता, सीरिजचे व्हिडीओ शेअर करून स्पृहा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते.