आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. यानिमित्त सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारही आज विविध पोस्ट्स शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री, कवीयित्री स्पृहा जोशी हिने तिने लिहिलेली एक खास कविता ऐकवत महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचबरोबर तिने त्यातून एक महत्वाचा संदेशही दिला आहे.
स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरीज अशा विविध माध्यमात भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मिडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत त्यांच्या संपर्कात राहते.
आणखी वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”
आता महिला दिनानिमित्त तिने तिची एक नवीन कविता ऐकवली आहे. आपल्याला सॉरी हा शब्द वापरायची खूप सवय झालेली असते आणि त्यामुळे अनेकदा आपण आपली चुक नसतानाही पटकन सॉरी म्हणतो. याच आशयाची तिची कविता तिने पोस्ट केली. “कशासाठी सॉरीचा आधार लागतो सतत, कशासाठी इतका गिल्ट सतत घ्यायचा विकत?” असे या कवितेचे शब्द आहेत. या व्हिडीओच्या शेवटी तिने एक छान संदेशही दिला. “आपली चुक नसताना उगाचच सॉरी म्हणणं आपण बंद करूया,” असं ती म्हणाली.
हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहीलं, “सतत सॉरी म्हणणं टाळूया.. आज आणि नेहमीच….जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा” आता तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या इतर कवितांप्रमाणेच या कवितेलाही तिचे चाहते उत्तम प्रतिसाद देत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत तिची ही कविता त्यांना खूप आवडल्याचं सांगितलं आहे.