‘उंच माझा झोका’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली स्पृहा जोशी ही सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लहान वयातच अभिनेत्रीने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. अभिनयाप्रमाणेच स्पृहा खूप सुंदर कविता देखील लिहिते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आज तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात देखील स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच स्पृहाने आरपार युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याबद्दल आपली स्पष्ट मतं मांडली.
स्पृहा जोशीला यावेळी मुग्धा गोडबोले यांनी “अलीकडच्या अनेक अभिनेत्रींनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. आजची पिढी असा विचार का करते?” याबद्दल विचारलं. यावर स्पृहा म्हणाली, “या सगळ्या गोष्टी फार वैयक्तिक असल्याने यात काय चूक काय बरोबर? याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना मूल हवं होतं आणि बाळ झाल्यानंतरही आज त्यांचं करिअर अगदी उत्तम सुरु आहे. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण घ्यायचं झालं, तर गिरीजा ओक, आरती यांनी बाळ झाल्यावर इंडस्ट्रीत पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली.”
हेही वाचा : ‘पारू’ आणि ‘शिवा’ पाठोपाठ ‘झी मराठी’वर लवकरच येणार दोन नव्या मालिका; नावं आली समोर
स्पृहा म्हणाली, “काहींचे विचार याच्या उलट असतात. माझ्या बाबतीत असं झालं की, मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कामच करत होते. काम उत्तम सुरु असताना मध्ये ब्रेक घेऊया असं मला आणि वरदला (स्पृहाचा पती) जाणवलं नाही. बाळाचा निर्णय हा आमचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे. माझा जन्म झाला तेव्हा माझी आई २३ वर्षांची होती. पण, याउलट मी २३ वर्षांची असताना रोज १२-१२ तास शूट करत होते. त्यामुळे तेव्हा काम थांबवावं असं मला नाही वाटलं आणि आताही ब्रेक घ्यावा असं मला नाही वाटत. बरं मूल झाल्यावर परत दोन वर्षांचा ब्रेक असेल, पुढे काम मिळेल की नाही…असा कोणताच विचार यामागे नाही. नशीबाने मला दोन्ही कुटुंबाकडून उत्तम साथ मिळाली आहे.”
हेही वाचा : Bigg Boss 17: आयशा खाननंतर इशा मालविया ‘बिग बॉस १७’मधून बेघर, ढसाढसा रडू लागला अभिषेक कुमार, म्हणाला…
“माझं माहेर आणि सासरच्यांनी आम्हाला दोघांनाही याबाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्ही दोघंही करिअरच्या ज्या टप्प्यावर आहोत, तिथे लगेच कोणताही निर्णय घेणं तेवढं सोपं नाही. आमचं असंही काहीच नाही की, कधीच मूल नकोय. अलीकडच्या काळात सगळ्या गोष्टी वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्वीपेक्षा फार पुढे गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे आता एक चॉइस आहे जो काही वर्षांपूर्वी बायकांकडे नव्हता. त्यामुळेच ठराविक वयात ठराविक गोष्टी झालेल्या बऱ्या असं म्हटलं जायचं. पण, आता गोष्टी बदलल्या आहेत.” असं मत स्पृहाने जोशीने मांडलं.