काही महिन्यांपूर्वी झी मराठीवर ‘लोकमान्य’ ही मालिका सुरू झाली. ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित होती. परंतु गेल्याच आठवड्यात या मालिकेने निरोप घेतला. आता ही मालिका संपताच स्पृहा जोशीने एक खास पोस्ट लिहिली आहे.
या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. पण कमी टीआरपी कारणाने या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. या मालिकेच्या शेवटच्या भागात दाखवण्यात आलेलं गाणं स्पृहा जोशीने लिहिलं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. तर आता या गाण्यामागची गोष्ट तिने एका पोस्टमधून सांगितली आहे.
आणखी वाचा : “माझ्या सासू-सासऱ्यांनी कधीच…”, स्पृहा जोशीने व्यक्त तिच्या मनातल्या भावना
“विझत चालल्या या भूमीला स्वराज्य हा उद्गार दिला,
मरू घातल्या लाख मनांना अभिमानाचा श्वास दिला…”
असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणं तयार करतानाचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “‘लोकमान्य’ मालिकेसाठी एक गाणं करावं असं आमचा निर्माता अक्षय पाटील याला वाटत होतं. ‘हे गाणं तू लिहिशील का’ असं विचारल्यावर मी अर्थातच आनंदाने तयार झाले. कविता लिहून झालीही. पण गाणं होण्याआधीच, मालिका बंद होत असल्याची बातमी कानावर झाली. तो विषय तिथेच संपला. पण या इतक्या सुंदर, मनाच्या जवळच्या मालिकेची सांगता होताना काहीतरी राहून जातेय असे सारखं वाटत होतं. मी माझा संगीतकार मित्र शुभंकर शेंबेकर ला फोन केला. नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला आणि अक्षरश: दोन दिवसात अप्रतिम चाल त्याने बांधली. क्षितिशच्या एका कॉलवर जयदीप वैद्य हा आमचा मित्र ते गाणं गायला तयार झाला. इतकंच नाही, तर या गाण्यातला तबलासुद्धा जयने वाजवलाय, स्वतःचं रेकॉर्डिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन! शुभंकर आणि जय यांनी या सगळ्यासाठी एकाही पैशाचा मोबदला घेतला नाही. सगळं फक्त आमच्या प्रेमापोटी!”
हेही वाचा : “तो माझा सासरा आहे पण…”, स्पृहा जोशीने दिली तिच्या आणि प्रथमेश लघाटेच्या नात्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…
पुढे तिने लिहिलं, “अक्षयने हे गाणं मी परस्पर रेकॉर्ड करून घेतलं तरीही आमच्या शेवटच्या एपिसोडला लावायचा निर्णय घेतला. हा त्याच्या, अपर्णा ताईच्या मनाचा मोठेपणा आहे. इतकी चांगली माणसं भेटणं हे लोकमान्यांचेच आशिर्वाद!! हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहेच. आवडलं असेल, तर अजूनही जरूर जास्तीत जास्त शेअर करा … या प्रवासाची आता खरी ‘पूर्तता’ झाली असं वाटतंय..!!
होई गर्जना केसरीतुनी इंग्रज केवळ थरकापे,
नभांगणाला व्यापुन उरले ‘लोकमान्य’ हे आज इथे।
– स्पृहा.”