श्रिती झा ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘दिलसे दी दुआ’ अशा मालिकांमध्ये काम करून तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. श्रितीला लिखाणाची खूप आवड आहे, काही वर्षांपूर्वी अलैंगिकतेबद्दल मंचावर एक कविता सादर केली होती, त्या कवितेची खूप चर्चा झाली होती. काहींना वाटलं होतं की श्रिती स्वतः अलैंगिक (Asexual) आहे, त्यामुळे तिने ती कविता लिहिली होती. आता त्याबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे.
काही वर्षांपूर्वी श्रितीने तिच्या पहिल्या ओपन माइकमध्ये अलैंगिक व्यक्तीबद्दल बोलली होती. ते ऐकून अनेकांना वाटलं की श्रिती स्वतःच्या आयुष्यातील अनुभव कथन करत आहे. आता ‘ई-टाइम्स’शी बोलताना तिने सांगितलं की तो फक्त तिच्या लिखाणाचा भाग होता. “मी माझ्या आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यातून जात असताना हा भाग लिहिला होता. मी एक पुस्तक वाचलं होतं, त्यात मी पहिल्यांदाच अलैंगिकतेबद्दल वाचलं होतं,” असं श्रिती म्हणाली.
“मी अलैंगिक आहे का? असा पहिला विचार ते पुस्तक वाचल्यावर माझ्या डोक्यात आला होता, ते विचार डोक्यात सुरू असतानाच ती कविता मी लिहिली होती. त्याबद्दल लोक काय म्हणतील याचा मी विचार केला नाही आणि ती कविता मी एका कार्यक्रमात सादर केली. लोक काय म्हणतील, याचा विचार करायला आता मी खूप मोठी झाले आहे. पण त्याला कवितेला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या कवितेनंतर खूप लोक मला भेटले आणि ती कविता सुंदर होती अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. त्या कवितेला लोकांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असं मला वाटलं नव्हतं,” असं श्रिती झा हिने नमूद केलं.
गेल्या काही वर्षांत श्रितीमध्ये खूप बदल झाला आहे. आधी शांत, लोकांमध्ये फारशी न मिसळणारी, लाजाळू स्वभावासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री आता मनमोकळेपणाने बोलत असते. तिने ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिखला जा’ या दोन रिॲलिटी शोमध्येही तिने भाग घेतला होता. “मला वाटतं की मी दर दोन वर्षांनी बदलत राहते, आणि माझ्या बदलत्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घेणाऱ्या माझ्या मित्रांचं मला खूप कौतुक आहे,” असं श्रिती म्हणाली.
एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?
‘कैसे मुझे तुम मिल गये’ या शोमध्ये झळकणारी श्रिती टीव्हीवर काम करून खूप आनंदी आहे. तिला टीव्ही सोडून ओटीटीवर गेलेल्या कलाकारांच्या यादीत सामील व्हायचंय का, असं विचारलं असता ती म्हणाली, “दोन वर्षे मी काम करत नव्हते, त्या काळात मी डिजिटल शोसाठी ऑडिशन देत होते, परंतु त्यातून काहीच काम मिळालं नाही. मात्र मला टीव्ही ऑफर्स येत राहिल्या आणि मी टीव्हीवरच काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.”