Star Pravah New Serial Aai Aani Baba Retire Hot Aahet Star Cast : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आजपासून ( २ डिसेंबर ) ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. रिटायमेंटनंतरचं आयुष्य जगताना या जोडप्याची कशी तारांबळ उडणार हे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ हे मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे राहातात. प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहीत धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी राहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही मालिका देखील अशाच एका जोडप्याभोवती फिरते. ज्यांना खरंतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. दिग्गज कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.
हेही वाचा : रेश्मा शिंदेच्या वाढदिवशी पतीची खास पोस्ट! कन्नडमध्ये लिहिला ‘तो’ खास शब्द; म्हणाला, “प्रेम, आनंद…”
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत मंगेश कदम यशवंत किल्लेदार तर, निवेदिता सराफ शुभा किल्लेदारांची भूमिका साकारत आहेत. याशिवाय या मालिकेत हरिश दुधाडे ( समीर किल्लेदार ), प्रतीक्षा जाधव ( सीमा किल्लेदार ), अपूर्वा परांजपे ( मिताली भोसले ), किआरा मंडलिक ( सानिया ) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच ‘काव्यांजली’ फेम अभिनेता आदिश वैद्यने मकरंद किल्लेदार तर, ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्री पालवी कदम या मालिकेत स्वीटी किल्लेदारची भूमिका साकारत आहे.
निवेदिता सराफ या मालिकेबद्दल म्हणाल्या, “आमच्या वयाच्या नटांची नेहमी एक खंत असते की आता आपल्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे. मात्र तरीही आई-वडिलांच्या भूमिकांमध्ये न अडकता आपल्यासाठीही मध्यवर्ती भूमिका लिहिली जावी. टीव्ही माध्यमाची मी आभारी आहे की आम्हाला मध्यवर्ती घेऊन भूमिका लिहिल्या जात आहेत. या मालिकेतलं शुभा हे पात्र मला खूपच भावलं. ‘माझ्याबरोबर आता तू देखील संसारातून रिटायर हो’ हे नवऱ्याचं म्हणणं तिला पटतं मात्र, तिचं मन मात्र हे मानायला तयार नसतं. घर-संसारात तिचा जीव अडकला आहे. प्रत्येक गृहिणीला आपलंसं वाटेल असं हे पात्र आहे” दरम्यान, आता या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत.