Star Pravah Serial Aai Aani Baba Retire Hot Aahet New Promo : गेल्या काही महिन्यांपासून निवेदिता सराफ यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ व मंगेश कदम यांची जोडी प्रेक्षकांना ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. मालिकेत या दोन प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त आणखी कोण झळकणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता होती. अखेर मालिकेच्या एका नव्या प्रोमोतून याचा उलगडा झालेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही बहुप्रतीक्षित मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार आहे. येत्या २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणार आहे. मालिकेच्या यापूर्वीच्या प्रोमोमध्ये निवेदिता आणि मंगेश कदम हे दोघंही रिटायरमेंट नंतर आयुष्य कसं जगायचं यावर चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

हेही वाचा : Video : १५ वर्षांपूर्वीच्या ‘या’ मालिकेतील कलाकारांचं पार पडलं Reunion; अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…

निवेदिता सराफ यांच्या मुलाची व सूनेची भूमिका साकारणार…

आता नव्या प्रोमोमध्ये रिटायरमेंट झाल्यावर दुसऱ्याच दिवशी स्वत:साठी जगत असताना हा जोडप्याची कशी गोड बोलून सुनेकडून अडवणूक केली जाते, यावर निवेदिता यांनी हसत-हसत उत्तर देत स्वीकारलेल्या सर्व जबाबदाऱ्या याची झलक पाहायला मिळते. आई आणि बाबा अर्थात निवेदिता आणि मंगेश कदम या प्रोमोमध्ये सायंकाळी जॉगिंगसाठी जात असतात. यावेळी नातीला घेऊन त्यांचा मुलगा येतो. या मुलाची भूमिका हरीश दुधाडे साकारत आहे. आई-बाबांचा आनंद पाहून मुलगा अतिशय आनंदी असतो. ते जॉगिंगला जायला निघणार एवढ्यात एन्ट्री होते अभिनेत्री प्रतिक्षा जाधवची…हीच मालिकेत निवेदिता यांच्या सुनेची भूमिका साकारणार आहे.

एसी दुरुस्त करण्यासाठी एक माणूस येईल त्यामुळे तुम्ही घरी थांबा उद्यापासून जॉगिंगला जा..आम्हाला शो पाहायला जायचंय आणि फक्त तीनच तिकिटं आहेत असं ही अभिनेत्री खडसावून सासूला सांगते. यावर निवेदिता जॉगिंगचा प्लॅन रद्द करून घरात थांबतात. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

दरम्यान, निवेदिता सराफ, मंगेश कदम, हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव असे लोकप्रिय कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. मालिकेच्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शशांक केतकरने यावर कमेंट करत ‘उत्तम’ असं म्हटलं आहे. ही नवीन आई प्रेक्षकांच्या भेटीला आल्यावर जुनी आई अर्थात अरुंधतीची ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah aai aani baba retire hot ahet new serial date time and know the whole starcast sva 00