Star Pravah New Serial Girija Prabhu Comeback : ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवीन मालिकांची घोषणा केली जाते. यावर्षी या सोहळ्याचं पाचवं वर्ष आहे. त्यामुळे यंदा प्रेक्षकांच्या भेटीला कोणती नवीन मालिका येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर वाहिनीने प्रोमो शेअर करत सर्वांना एका लोकप्रिय नायिकेच्या पुनरागमनाची आनंदाची बातमी दिली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने डिसेंबर महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता. आता गिरीजा एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्यावेळी तिच्या भूमिकेचं नाव गौरी होतं. या गौरीने जवळपास चार वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं. मात्र, यावेळी गिरीजा कोकणातली ‘कावेरी’ होऊन सर्वांसमोर आलेली आहे. अर्थात, गिरीजा प्रभू साकारणाऱ्या नव्या भूमिकेचं नाव कावेरी आहे.

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या नव्या मालिकेतून गिरीजा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुनरागमन करत आहे. “येतेय कोकणची कावेरी, जणू बाळाची दुसरी आईच…” असं कॅप्शन देत वाहिनीने नव्या मालिकेचा प्रोमो सर्वांबरोबर शेअर केला आहे.

गिरीजाच्या साथीने या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले झळकणार आहेत. अभिनेते तिच्या वडिलांच्या भूमिका या मालिकेत साकारतील. गिरीजा आणि वैभव मांगले यांच्यातील प्रेमळ मालवणी संवाद पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाला.

गिरीजा प्रभू, वैभव मांगले यांच्यासह अमीत खेडेकर आणि अमृता माळवदकर यांची झलक प्रेक्षकांना ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. गिरीजाचं पुनरागमन पाहून चाहत्यांचं आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याशिवाय समृद्धी केळकर, माधवी निमकर, साक्षी गांधी, रेवती लेले या अभिनेत्रींनी गिरीजावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader