‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ अशा दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. प्रेक्षकांच्या मनात या दोन्ही मालिकांबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली असतानाच वाहिनीने नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा बिरारी आणि ‘बिग बॉस’ विजेता अभिनेता विशाल निकम यांची फ्रेश जोडी झळकणार आहे.
पूजा-विशालच्या नव्या मालिकेचं नाव ‘येड लागलं प्रेमाचं’ असून विठुरायाच्या पंढरपूर नगरीत या मालिकेची गोष्ट उलगडणार आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता विशाल निकम आणि ‘स्वाभिमान’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा बिरारी या मालिकेत राया आणि मंजिरीची भूमिका साकारताना दिसतील. नुकताच या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
विशालसह या मालिकेत आणखी एका ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून SPLITSVILLA च्या तेराव्या पर्वाचा विजेता जय दुधाणे आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मालिकेत झळकणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा : स्टार प्रवाह परिवार पुरस्कार : ‘ठरलं तर मग’ने मारली बाजी! यंदाची सर्वोत्कृष्ट जोडी, सासू-सून, खलनायिका ठरली…; पाहा संपूर्ण यादी
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत जय दुधाणे नेमक्या कोणत्या भूमिकेत झळकणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती अभिनेत्याने दिलेली नाही. आता ही नवीन मालिका नेमकी कोणत्या वेळेत सुरू होणार आणि ‘येड लागलं प्रेमाचं’ सुरू झाल्यावर प्रवाहवरील कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा : Video: ‘साधी माणसं’नंतर ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची घोषणा, पूजा बिरारी-विशाल निकमसह ‘हे’ कलाकार झळकणार
दरम्यान, जबरदस्त पहिला प्रोमो प्रदर्शित केल्यावर आता लवकरच स्टार प्रवाह वाहिनी या नव्या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करेल. “माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखील पंढरपूरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पूजा बिरारीबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय. ती खूप समजूतदार आहे आणि स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पूजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत.” अशी भावना या मालिकेबद्दल विशाल निकम याने व्यक्त केली.