मराठी मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्यांपैकी एक पुरस्कार सोहळा म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा. (Star Pravah Award) ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कारांचं यंदा पाचवं वर्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून अवघा महाराष्ट्र या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड यांच्यासह महेश कोठारे, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर यांसारख्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडचे विश्व गाजवणारी मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) देखील खास हजेरी लावणार आहेत. ‘धक धक गर्ल’च्या येण्याने या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढणार आहे.

समीर परांजपेचं माधुरी दीक्षितसाठी खास सादरीकरण

माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीनीवर प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार (Star Pravah Award) सोहळ्याला माधुरी दीक्षितने आपली खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्याचे अनेक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. स्टार प्रवाहवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतील तेजस म्हणजेच अभिनेता समीर परांजपेने (Sameer Paranjape) माधुरी दीक्षितचे आपल्या गायकीने मन जिंकले. समीर हा अभिनेता असण्याबरोबरच एक गायकही आहे, त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यात त्याने माधुरी दीक्षितसाठी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर खास गायन केलं.

समीर परांजपेचा माधुरी दीक्षितबरोबर डान्स

या प्रोमोमध्ये समीर (Sameer Paranjape) असं म्हणतो की, “माधुरी मॅम समोर आहेत, त्यामुळे कुणाचा आवाज फुटेल हे माहीत नाही” असं तो म्हणतो. यानंतर समीर माधुरीच्या ‘पेहला पेहला प्यार हैं’ या गाजलेल्या गाण्यावर आधारित ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणं गातो, तर ‘एक दोन तीन चार’ या गाण्यावर आधारित तो ‘चांदोबा चांदोबा’ हे गाणं सादर करतो. याशिवाय तो माधुरीसह डान्सदेखील करतो. समीरच्या या खास सादरीकरणाबद्दल माधुरी दीक्षितबरोबरच (madhuri dixit) सगळेच उपस्थित कौतुक करतात आणि त्याला भरभरून दाद देतात.

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार कधी पाहता येणार?

माधुरी (Madhuri Dixit) मखमली साडी आणि गळ्यात मोत्याचा नेकलेस घालून सुंदर अशा इंडो-वेस्टर्न लूकमध्ये या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. तिच्या एन्ट्रीने सगळेच भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, माधुरीच्या उपस्थितीत पार पडलेला ‘स्टार प्रवाह परिवार’ (Star Pravah Award) हा सोहळा येत्या १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.