Star Pravah Awards Ashok Saraf & Lakshmikant Berde : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याचं यंदा पाचवं वर्ष आहे. यानिमित्ताने या अवॉर्ड शोमध्ये यावर्षी महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मराठी मालिका असो किंवा चित्रपट अशोक सराफ यांनी कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘शेजारी शेजारी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला. यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर करून त्यांचा सन्मान केला.

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांवर कलाकारांनी विविध परफॉर्मन्स सादर केले. सगळ्या कलाकारांनी मिळून मंचावर त्यांचं औक्षण केलं. यानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याला एक आभासी फोन आला. हा फोन होता जिवलग मित्राचा, ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या दोघांच्या ‘दोस्ती’ला सर्व स्तरांतून प्रेम मिळालं. मात्र, आजारपणामुळे १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला.

आजही अशोक सराफ नेहमीच आपल्या जवळच्या मित्राची आठवण काढतात. लक्ष्मीकांच बेर्डे यांना इंडस्ट्रीत प्रेमाने ‘लक्ष्या’ असं म्हटलं जायचं. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांच बेर्डे यांचा आभासी फोन आल्यावर अशोक सराफ यांचे डोळे पाणावले. उपस्थित सगळेच कलाकार यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

“हॅलो हॅलो अशोक…. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले मज्जा… तुझा आज होणारा सन्मान पाहून डोळे भरून आले बघ. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. ही दोस्ती तुटायची नाय….” आभासी फोनवरचे जवळच्या मित्राचे हे शब्द ऐकताच अशोक सराफ यांचे डोळे पाणावले. निवेदिता सराफ, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रुपाली भोसले अशा सोहळ्याला उपस्थित असलेल्या सगळ्याच कलाकारांना याप्रसंगी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली.

‘स्टार प्रवाह वाहिनी’ने “ही दोस्ती तुटायची नाय… अशोक सराफ यांचा सन्मान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण यामुळे सगळ्यांचेच डोळे पाणावले.” असं कॅप्शन देत हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, १६ मार्चला प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना हा भावनिक क्षण पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी ७ वाजता या शोचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Story img Loader