सध्या मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय श्रेयस तळपदे, सायली संजीव अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलेलं आहे. त्यामुळे नव्या मालिका अन् शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

जेव्हा वाहिनीवर एखादी नवीन मालिका किंवा शो सुरू होतो तेव्हा अनेक जुन्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो किंवा टीआरपीची आकडेवारी पाहून जुन्या मालिकांच्या वेळा त्यानुसार बदलण्यात येतात.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात ‘साधी माणसं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर एकत्र काम करू लागली. सुरुवातीला ऑन एअर झाल्यावर ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जायची. मात्र, काही महिन्यांआधीच या मालिकेची मूळ वेळ बदलून १ वाजताची करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये ‘साधी माणसं’ ही मालिका दुपारच्या स्लॉटला शिफ्ट करण्यात आली.

आता जवळपास चार महिन्यांनी पुन्हा एकदा ‘साधी माणसं’ मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ही नवीन मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाईल. सध्या या वेळेला ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळे ‘साधी माणसं’ सायंकाळी ऑन एअर झाल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं काय होणार असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. अनेकांनी मालिकेच्या वेळेत दोन वेळा बदल केल्याने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘साधी माणसं’ मालिका सायंकाळी ६:३० ला प्रसारित होतेय याची अधिकृत माहिती या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या आकाश नलावडेने देखील इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.

star
‘साधी माणसं’ फेम आकाश नलावडेची पोस्ट ( Star Pravah )

दरम्यान, आता १ एप्रिलपासून हा बदल झाल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका किती वाजता प्रक्षेपित होणार याची कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही.