Star Pravah : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपीवरून ठरवली जाते. गेली काही वर्षे ‘स्टार प्रवाह’ वाहिनी या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या वाहिनीच्या बहुतांश मालिका या टीआरपीच्या यादीत टॉप-१० मध्ये असतात. सध्या याच पार्श्वभूमीवर ‘स्टार प्रवाह’वर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
‘स्टार प्रवाह’ने नुकत्याच त्यांच्या ४ मालिकांच्या वेळेत बदल केला आहे. ‘उदे गं अंबे – कथा साडेतीन शक्तीपीठांची’ ही मालिका आधी ६.३० वाजता वाहिनीवर प्रसारित केली जायची. मात्र, नव्या वेळेनुसार आता ही मालिका सायंकाळी ६.०० वाजता प्रक्षेपित केली जाईल.
तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीआरपीवर मोठा परिणाम झाला. यामुळेच या मालिकेची रात्री आठची वेळ बदलून आता ही मालिका सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाते. यानंतर, ७ वाजता नेहमीप्रमाणे मृणाल दुसानिसची ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका नव्या वेळेनुसार संध्याकाळी ७.३० ते ८.१५ या वेळेत प्रसारित केली जाईल. तर, ‘ठरलं तर मग’ मालिका ८.१५ ते ९ अशी पाऊणतास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बदल १० फेब्रुवारीपासूनच करण्यात आला होता. पण, इथून पुढेही हा बदल कायम राहणार आहे.
२ मार्चपासून प्रेक्षकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय
याशिवाय, येत्या २ मार्चपासून प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या चारही मालिका पुढचे काही दिवस सोमवार ते रविवार असे आठवड्याचे सात दिवस प्रसारित केल्या जाणार आहेत.

सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “ठरलं तर मग’ आता २ मार्चपासून सोमवार ते रविवार ८.१५ ते ९ या वेळेत पाहता येणार आहे” असं अभिनेत्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.