Star Pravah Cooking Show Shitti Vajali Re : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर या महिन्यात एक नवाकोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘शिट्टी वाजली रे’. या शोमध्ये सेलिब्रिटींना विविध पदार्थ बनवण्याचा टास्क मिळणार आहे. पण, दररोज टीव्हीवर सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारे हे कलाकार किचनमध्ये कसं काम करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘स्टार प्रवाह’ने ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित केला होता. यामध्ये निक्की तांबोळी, आशिष पाटील, विजय पाटकर, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक या कलाकारांची झलक पाहायला मिळाली होती. यांच्या जोडीला या शोमध्ये आणखी कोणाची एन्ट्री होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या शोचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पाहतच असतो. पण, त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाच्या मंचावरून पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर येणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’ फेम संजना म्हणजेच रुपाली भोसले, ‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर, नृत्यांगना गौतमी पाटील, पुष्कर श्रोत्री, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे यांची एन्ट्री झालेली आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील. हे सगळे लोकप्रिय सेलिब्रिटी कुकिंग शोमध्ये एकत्र झळकणार असल्याचं पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम येत्या २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. नेटकऱ्यांनी या शोचा प्रोमो पाहताच कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठीत पहिल्यांदाच हा आगळावेगळा कार्यक्रम येणार असल्याने सगळेच हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.