‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर १८ मार्चपासून सुरू होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे स्टार प्रवाहवर कमबॅक करणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना रेश्मा शिंदेची झलक पाहायला मिळाली होती. यानंतर आता आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये मुख्य अभिनेत्याशिवाय मालिकेची अन्य स्टारकास्ट समोर आली आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मासह सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने व बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचं गेल्या प्रोमोमधून समोर आलं होतं. आता वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये आणखी तीन नव्या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. हे कलाकार कोण आहेत जाणून घेऊयात…
‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे अभिनेता आशुतोष पत्की घराघरांत लोकप्रिय झाला होता. यामध्ये त्याने साकारलेलं बबड्या हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अभिनेता आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत सौमित्र हे पात्र साकारणार आहे. याशिवाय ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर देखील या नवीन मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारेल. नव्या प्रोमोनुसार प्रतिक्षा “घरोघरी…” मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : विराट कोहली-अनुष्का शर्माने चिमुकल्या लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’; अर्थ आहे खूपच खास, जाणून घ्या…
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत असून तिच्यासह मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. ही मालिका येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.