‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. या दोन्ही मालिकांची सध्या जबरदस्त चर्चा चालू आहे. यापैकी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा शिंदे ‘जानकी रणदिवे’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे. मालिकेत तिच्यासह तगडे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. परंतु, मुख्य अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार हे वाहिनीकडून एवढे दिवस गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. अखेर जानकी रणदिवेच्या नवऱ्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून कोणाची वर्णी लागणार याबद्दल गेले अनेक दिवस चर्चा चालू होत्या. अखेर ‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये हृषिकेश रणदिवेची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सुमीत पुसावळे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
सुमीतने नुकतीच इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा निरोप घेतल्याचं सांगितलं होतं. आता ‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये हृषिकेश रणदिवेच्या भूमिकेत सुमीतचा रुबाबदार अंदाज पाहायला मिळत आहे. या नव्या प्रोमोमधून मालिकेतील सगळ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.
हेही वाचा : Video : सासूबाईंसह डान्स, बाबांनी लावली लेकीला हळद अन्…; ‘असा’ पार पडला पूजा सावंतचा हळदी सोहळा
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा व सुमीतसह सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे.
प्रतिक्षा पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत झळकणार असं हा नवा प्रोमो पाहून लक्षात येत आहे. त्यामुळे जानकी आणि हृषिकेश आता आपल्या कुटुंबाला कसं जोडून ठेवणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याशिवाय शिवानी बावकरची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ ही मालिका सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाईल.