Aata Hou De Dhingaana 3: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात दोन टीममधली सांगीतिक लढत पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. सिद्धार्थ जाधवने या कार्यक्रमाचं जबरदस्त सूत्रसंचालन करून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. या आठवड्यात ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमात होळी विशेष भाग असणार आहे. याचे प्रोमो नुकतेच समोर आले आहेत. यामधील एका प्रोमोमध्ये नायिका व खलनायिकांमध्ये भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. पण, नायिका व खलनायिकांमध्ये कशामुळे भांडण झालं? जाणून घ्या…
‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या ( Aata Hou De Dhingaana 3 ) होळी विशेष भागात ‘स्टार प्रवाह’च्या नायिका व खलनायिका यांच्यात सांगीतिक लढत होणार आहे. याचे प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. एका प्रोमोमध्ये नायिका व खलनायिकांमध्ये भव्य कुस्ती सामना रंगल्याचं दिसत आहे. पण दुसऱ्या प्रोमोमधून नायिका व खलनायिकांमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं आहे.
प्रोमोमध्ये, घंटा घरात समृद्धी केळकर गेल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी घंटा घरातून समृद्धी हंड्यातील पैसे बघून आणत असल्याचा आरोप खलनायिकांनी लावला आहे. यावरून नायिका व खलनायिकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हे प्रकरण एवढं वाढलं की, सिद्धार्थला चॅनेलच्या लोकांना मंचावर बोलवाव लागलं. तेव्हा चॅनेलच्या एका व्यक्तीने सांगितलं की, आपण फुटेज एकदा चेक करुया. पण, रागात असलेली ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर म्हणाली की, तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी आताच हा शो सोडते.” त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडलंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाच्या मंचावर नायिका व खलनायिकांमध्ये भांडण झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे या वादात नेमकं काय होतंय? हे जाणून घेण्यासाठी ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा ( Aata Hou De Dhingaana 3 ) आगामी भाग पाहणं गरजेचं आहे. शनिवारी रात्री ९ वाजता आणि रविवारी रात्री १०.३० वाजता हा होळी विशेष भाग प्रसारित होणार आहे.