Star Pravah Kon Hotis Tu Kay Zalis Tu : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने डिसेंबर महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव ही जोडी गौरी-जयदीपच्या भूमिकेत झळकली होती. जुनी मालिका संपल्यावर अवघ्या ३ महिन्यांतच ही जोडी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेतून मंदार जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार ‘यश धर्माधिकारी’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. महाराष्ट्राची ही लोकप्रिय जोडी या नव्या मालिकेतून कावेरी आणि यशच्या रुपात पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत मंदारच्या म्हणजेच यशच्या आईची भूमिका अभिनेत्री सुकन्या मोने साकारणार आहेत.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘स्टार प्रवाहबरोबर काम करणं नेहमीच आनंददायी अनुभव असतो. ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’नंतर आता ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही तिसरी मालिका ‘स्टार प्रवाह’बरोबर करतोय. आधीच्या दोन्ही भूमिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. या मालिकेत मी ‘यश धर्माधिकारी’ हे पात्र साकारतोय. दिसायला अतिशय देखणा, आपल्या लूक्सबद्लल सदैव जागृक असलेल्या यशला फॅशनची उत्तम जाण आहे. अनेक मुली यशच्या प्रेमात आहेत मात्र, यशने आईला वचन दिलं आहे की, तिच्या आवडीच्या मुलीशीच तो लग्न करेल. त्याचं त्याच्या कुटुंबावर आणि खास करुन त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. आई जे सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. हे पात्र साकारताना खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत. मला खात्री आहे जे प्रेम प्रेक्षकांनी जयदीप या पात्राला दिलं तेच प्रेम यश या पात्रावर देखील करतील.”

‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही नवीन मालिका २८ एप्रिलपासून स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. गौरी-जयदीपला पुन्हा एकत्र पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.