Laxmichya Paulanni : छोट्या पडद्यावरच्या मालिकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि अर्थात टीआरपीच्या दृष्टीकोनातून नेहमीच रंजक ट्विस्ट आणले जातात. गेल्या काही वर्षांत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहिनीवरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका घराघरांत विशेष लोकप्रिय आहे. अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांची भांडणं, त्यांच्यामधलं अव्यक्त प्रेम याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या मालिकेत आधीच दोन कलाकारांच्या एन्ट्री झालेल्या आहेत. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश होणार आहे. यापूर्वी ध्रुव दातारने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर त्याच्याऐवजी अद्वैत कडणेने या शोमध्ये एन्ट्री घेतली होती. या पाठोपाठ मालिकेत अभिनेत्री सानिका बनारसवालेच्या रुपात एक नवीन नयना आली आणि आता या मालिकेत अनामिका आलेली आहे.
नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती…
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत तृष्णा चंद्रात्रे या अभिनेत्रीने एन्ट्री घेतली आहे. ती या मालिकेत अनामिकाची भूमिका साकारणार आहे. सोहम चांदेकर गाडी चालवत असताना चुकून त्याचा धक्का आजी-आजोबांना लागणार असतो. पण, या दोघांना अनामिका सुखरुप बाजूला घेते. यानंतर सगळे लोक घडलेल्या प्रकाराचा सोहमला दोष देतात. पण, अनामिका सोहमची बाजू घेते. पहिल्या नजरेतच सोहम तिला ओळखतो. या दोघांची आधीपासूनच ओळख असते असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत.
तृष्णा चंद्रात्रे गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत आहे. हृता दुर्गुळेच्या ‘फुलपाखरू’ या गाजलेल्या मालिकेत तिने काम केलेलं आहे. याशिवाय तृष्णा ‘अंतरपाट’, ‘हृदयी प्रीत जागते’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमध्येही झळकली आहे. ‘भाडिपा’च्या ‘झूम’ या वेबसीरिजमध्ये सुद्धा तृष्णाने काम केलेलं आहे. आता पुन्हा एकदा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला तृष्णा सज्ज झाली आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेबद्दल थोडक्याच सांगायचं झालं, तर अक्षर कोठारी, ईशा केसकर यांच्यासह मंजुषा गोडसे, मिलिंद ओक, दिपाली पानसरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही मालिका ( Laxmichya Paulanni ) ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते. याशिवाय टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं.