Star Pravah : छोट्या पडद्यावरील कलाकारांचा घराघरांत एक वेगळा चाहतावर्ग तयार होतो. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिका टीआरपीच्या आकडेवारीत कायम टॉप-२ मध्ये असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका दोन लोकप्रिय कलाकारांनी सोडल्याचं पाहायला मिळालं आणि आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ( Laxmichya Paulanni ) या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अक्षर या मालिकेत अद्वैत चांदेकर ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर, ईशा केसकरच्या व्यक्तिरेखेचं नाव कलानिधी खरे असं आहे.
डिसेंबर महिन्यात अद्वैतच्या भावाची म्हणजेच राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. यानंतर महिन्याभराने कलानिधी खरेची बहीण नयना खरे हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून एक्झिट घेतली. आता या दोघांपाठोपाठ या मालिकेतून तिसरी एक्झिट झाली आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून आणखी एक एक्झिट…
अद्वैतची आई आणि कलाच्या सासूची म्हणजे सरोज चांदेकर ही भूमिका साकारणाऱ्या मंजुषा गोडसेंनी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सोडली आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोत प्रेक्षकांना नव्या सरोज चांदेकरांची झलक पाहायला मिळत आहे.
मंजुषा गोडसे यांनी गेली दीड वर्षे या मालिकेत सरोज हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. त्यामुळे त्यांच्या एक्झिटनंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ( Laxmichya Paulanni ) ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. या मालिकेत प्रेक्षकांना दमदार अशी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा कायम टॉप- २ मध्ये असते. यंदाच्या ‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्यात या मालिकेला ‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.