छोट्या पडद्यावर गेले काही दिवस अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेच्या टीआरपीत सातत्य राखण्यासाठी मेकर्सकडून नेहमीच विविध योजना आखल्या जातात. अनेकदा कथानकाच्या आवश्यकतेनुसार लोकप्रिय कलाकार मालिकेत कॅमिओ करताना दिसतात. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत अशीच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. आजवर तिने नाटक, सिनेमा व मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप उमटवली आहे. तसेच यापूर्वी तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोगवा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’वरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही दिवसांपूर्वीच दोघं लग्नाच्या बेडीत अडकले होते. सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली. सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी, तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.

हेही वाचा : गोळीबार प्रकरणानंतर सलमान सेटवर केव्हा परतणार? वडील सलीम खान म्हणाले, “सरकारने आम्हाला…”

सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी हुशार वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे या मालिकेत नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे. नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे. अतिशय हुशार, तल्लख आणि चालाख असलेली नेत्रा…आजवर एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हटल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकाप उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.

हेही वाचा : ईशा मालवीय अन् समर्थ जुरेलचं ब्रेकअप, ‘बिग बॉस’च्या घरात दिलेली प्रेमाची जाहीर कबुली अन् आता केलं अनफॉलो

स्मिता तांबेची एन्ट्री

आता नेत्राच्या येण्याने या केसमधून सार्थक निर्दोष सुटणार का? सार्थक-आनंदीच्या आयुष्यात कोणती नवी आव्हानं येणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ संध्याकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित करण्यात येते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry know in details sva 00