Star Pravah Mi Honar Superstar Chhote Ustaad 3 Winner : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरचा सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम फेरीची लढत रंगली होती. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.
‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३’ ( Star Pravah ) या कार्यक्रमाची विजेती गीत बागडे ठरली असून, उपविजेता पदावर संगमनेरच्या सारंग भालकेने आपलं नाव कोरलं आहे. या स्पर्धेत विरारच्या पलाक्षी दीक्षितने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर, उत्तेजनार्थ पारितोषिक जुई चव्हाण, देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने यांना विभागून देण्यात आलं.
हेही वाचा : लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
यवतमाळच्या विजेत्या गीत बागडेला ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाच्या परीक्षकांकडून पाच लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना गीत बागडे म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला.”
“आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांसारखे दिग्गज गायक गुरुंच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या रुपात नव्या पिढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखील मी ऋणी आहे.” अशा भावना गीतने व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : “आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
गीत बागडे जरी या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी ‘स्टार प्रवाह’ ( Star Pravah ) परिवाराकडून शेवटी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.