स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र या मालिकेतील प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी लवकरच स्टार प्रवाह वाहिनी नव्या विषयावर आधारित नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.
मुलगी झाली हो ही मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आल्याचे बोललं जात आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता या मालिकेत शौनकचे लग्न होणार आहे. त्याच्या आईने साजिरीच्या वडिलांना याचे आमंत्रणही दिले आहे. तर दुसरीकडे शौनकला गोजिरी ही आपलीच मुलगी असल्याचे सत्य समजल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तो लग्न करणार की नाही, याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका संपणार असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “बुलेट ट्रेननंतर हास्यजत्रा…” मालिकेत कमबॅक करणाऱ्या विशाखा सुभेदारने ट्रोल करणाऱ्याला खडसावले
त्यातच स्टार प्रवाहवर ‘शुभविवाह’ नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जाणार आहे. येत्या १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे. ‘शुभविवाह’ या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
आणखी वाचा : वर्षभराच्या ब्रेकनंतर विशाखा सुभेदार करणार मालिकेत पुनरागमन, प्रोमो समोर
या मालिकेच्या प्रोमोनंतर आता मुलगी झाली हो ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. या मालिकेचा शेवट सकारात्मक दाखवला जाणार आहे. यात शौनक आणि साजिरी अखेर एकत्र येणार, अशी आशा प्रेक्षकांना आहे. त्याबरोबरच कधीही न बोलणारी साजिरी आता मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात बोलताना दाखवले जाणार आहे. त्यामुळे मालिकेच्या शेवटच्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे.