‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘मुरांबा.’ अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशाणी बोरुळे, सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी, अभिजीत चव्हाण अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेली ही मालिका तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शशांकने साकारलेला अक्षय असो किंवा शिवानीने साकारलेली रमा असो प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांना आपलंस वाटत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. ‘मुरांबा’ मालिकेची दुपारची वेळ असली तरी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. यामुळेच ‘मुरांबा’ मालिकेने १००० भागांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने शशांक केतकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
व्हिडीओमध्ये शशांक केतकर म्हणाला, “नमस्कार, बघता बघता ‘मुरांबा’ या मालिकेने आज १००० भाग पूर्ण होतं आहेत. माझ्यासाठी हा प्रवास खूप रंजक होता. आपण असं म्हणतो ना, वय हा नुसता आकडा आहे. तसंच १००० हा फक्त आकडा आहे. पण त्या १००० भागांत काय धमाल केली? कसे सीन शूट केले? आम्ही काय शिकलो? हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचं वय कितीही असो, पण तुम्ही ते कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. तसंच १००० हा फक्त आकडा आहे, पण १००० भागांमध्ये आम्ही काय केलं हे महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर, सेंच्युरी ही महत्त्वाची असते. पण, तुमच्या टीमसाठी तुम्ही केलेले ५०, ७५, ९०, ९५, ९९ रन सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात.”
पुढे शशांक केतकर म्हणाला, “तर मला वाटतंय की, आम्ही ज्यांच्यामुळे हा प्रवास करू शकलो ते महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह.’ यांचा पाठिंबा आमच्याबरोबर होता, यांचा विश्वास आमच्यावर होता. म्हणून ‘स्टार प्रवाह दुपार’ नवीन प्रयोग करू पाहिला आणि ती संधी आम्हाला दिली. त्याबद्दल ‘स्टार प्रवाह’चे मला मनापासून आभार मानायचे आहेत. दुसरं म्हणजे पॅनोरमा एंटरटेनमेंट त्यांचं पाठबळ आणि ते आमच्याबरोबर होते म्हणून आमची सगळी टीम एकत्र घट्ट कायम राहिली. माझ्याबद्दल वैयक्तिक सांगायचं झालं तर, माझ्या ज्या काही मागण्या होत्या, माझ्या काही तक्रारी होत्या, माझे जे काही सल्ले होते, ते सगळं हसतमुखाने स्वीकारलं, त्याबद्दल पॅनोरम एंटरटेनमेंटचे आभार. खरंच तुम्ही होता म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याशिवाय आमचे सगळे दिग्दर्शक. म्हणजे ज्यांनी आमची गोष्ट सुरू केली ते म्हणजे विघ्नेश कांबळे. त्यांनी आमची गोष्ट छान वळणावरती सुरू केली आणि तोच धागा पकडून आजही आम्ही तुमचं मनोरंजन करत आहोत. आताचे आमचे दिग्दर्शक ते म्हणजे सुशांत पोळ. सुशांत सरांच्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे आहेत.”
“त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची म्हणजे आमची लेखिका. जिच्याशिवाय आमची ही गोष्ट उभी राहू शकत नाही. तिची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. १००० भाग लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. तिच्या डोक्यात ज्या काही छान-छान कल्पना सुचत असतात, त्या अशाच पिकत राहूदेत आणि आमच्यासमोर समोर तिचं लिखाण आव्हानं म्हणून उभं राहू देत आणि ते आव्हान ज्यांच्याबरोबर मला स्वीकारायला आवडतं ते म्हणजे माझे सहकलाकार. यार माझ्या टीमबद्दल काय बोलू. प्रतिमा कुलकर्णींसारखी अत्यंत दिग्गज, मोठी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळतेय. मग माझ्या बाबांची भूमिका साकारणारा अभिजीत चव्हाण, माझा काकाची भूमिका करणारा विश्वास नवरे, माझी सगळी भावंडं आशिष, विपुल, राजश्री, माझी आई सुलेखा तळवळकर, त्यानंतर वहिनी आधीची स्मिता आणि आताची मिरा, रमा म्हणजे शिवानी, रेवा म्हणजे निशाणी या दोघी रमाच्या घरचे सगळे, छोट्या छोट्या भूमिकांसाठी आलेले सगळे मित्र, यांचे मनापासून आभार मानतो. ते होते म्हणून मी माझी भूमिका वटवू शकलो. तुमचेही प्रेम असेच राहूदेत. तुमच्याही मनात ज्या काही माझ्याबद्दलच्या तक्रारी असतील तर मला लहान समजून माफ करा,” असं शशांक केतकर म्हणाला.
शशांक केतकरने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “‘मुरांबा’ या आमच्या ( खरं तर तुमच्या ) मालिकेचे आज १००० भाग पूर्ण होतायत. खूप मोठा टप्पा गाठला आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ हा प्रवास सुरू आहे आणि तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव अजूनही होतो आहे. हे सगळं खरंच एका स्वप्नासारखं वाटतंय. कोणत्याही कलाकाराला पारितोषिकांपेक्षा तुमची प्रतिक्रिया, कौतुकाची थाप आणि प्रेमाची साथ हवी असते. हे सगळंच या १००० भागात मला भरभरून मिळालं.”
“माझ्यातला ( हट्टी ) विद्यार्थी कायम भुकेला असतो. जो इथून पुढेही असेल. मी स्वतः किती भाग झाले या पेक्षा गोष्ट किती रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे यावर विश्वास ठेवतो. यापुढेही माझ्यासाठी गोष्ट आणि तुमचं मनोरंजन सगळ्यात महत्वाचं असेल. स्टार प्रवाह, पॅनोरमा एंटरटेनमेंट तुमचे मनापासून आभार. हे अतूट नातं सदैव असंच राहूदे. पडद्यावरचे आणि मागचे सर्व सह कलाकार, तुमच्यामुळे माझ्या कष्टांना अर्थ मिळाला. खूप खूप प्रेम तुम्हाला,” असं शशांक केतकरने लिहिलं आहे.