सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचं सत्र सुरू आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’, ‘पारु’, ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला ‘अशा एकूण पाच नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. अशातच ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेतील लाडकी दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे नव्या रुपात पाहायला मिळत आहे.
‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. “खेळामध्ये संसाराच्या, आनंदाचे राज्य येवू दे…” असं कॅप्शन लिहित नव्या मालिकेचा पहिला प्रोमो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे नव्या रुपात दिसत आहे. ‘जानकी’ असं तिच्या नव्या भूमिकेचं नाव आहे. तर ‘घरोघरी मातीच्या चुली’ हे नव्या मालिकेचं नाव आहे.
हेही वाचा – श्रेयस तळपदे आजारपणानंतर करणार दमदार कमबॅक! पहिल्यांदाच महेश मांजरेकरांसह करणार काम, जाणून घ्या…
‘स्टार प्रवाह’च्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेच्या प्रोमोवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुजा साठे, तेजश्री प्रधान, अमित भानुशाली, विधिशा म्हसकर, मयुरी देशमुख, मिनाक्षी राठोड, चेतन वडनेरे अशा अनेक कलाकारांनी रेश्माला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नव्या मालिकेच्या जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा –पूनम पांडेच्या निधनानंतर चर्चांना उधाण; कर्करोग नाही तर ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू?
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’वर नवी मालिका सुरू होतेय तर मग कुठली जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका नव्या वेळेत प्रक्षेपित होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.