Star Pravah New Serial Kon Hotis Tu Kay Zalis : ‘स्टार प्रवाह’ची सुपरहिट मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून घराघरांत पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या नव्याकोऱ्या मालिकेतून गिरीजा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पुरस्कार सोहळ्यादरम्यान या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला. गिरीजाच्या साथीने या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले झळकणार आहेत. अभिनेते तिच्या वडिलांच्या भूमिका या मालिकेत साकारतील. गिरीजा आणि वैभव मांगले यांच्यातील प्रेमळ मालवणी संवाद पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाला.
‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरीजा प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, “स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे. पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे मालवणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी मालवणी भाषेचे धडे गिरवत आहे. कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल. गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू! लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.”
दरम्यान, गिरीजा प्रभू, वैभव मांगले यांच्यासह अमीत खेडेकर आणि अमृता माळवदकर यांची झलक प्रेक्षकांना ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.