Kon Hotis Tu Kay Zalis Tu Star Pravah New Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका व कार्यक्रम सुरू होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचं नाव आहे ‘कोण होतीस तू काय झालीस तू’. ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हापासून येणार जाणून घेऊयात…
या नव्या मालिकेच्या माध्यमातून गिरीजा प्रभू व मंदार जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांचे लाडके गौरी-जयदीप आता कावेरी अन् यशच्या रुपात सर्वांचं मनोरंजन करतील. या मालिकेत गिरीजा-मंदारसह सुकन्या मोने, वैभव मांगले, भाग्यश्री पवार, अमित खेडेकर, अमृता माळवदकर या कलाकारांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून ही नवीकोरी मालिका कोणत्या वेळेला प्रसारित केली जाणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर वाहिनीने या मालिकेच्या प्रसारणाची अधिकृत वेळ व तारीख जाहीर केली आहे.
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका येत्या २८ एप्रिलपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. गिरीजाची नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन्ही मालिका त्यांच्या मूळ वेळेला म्हणजे ७:३० आणि ८:३० प्रसारित होण्याची शक्यता आहे.
आता गिरीजा-मंदारचं अवघ्या तीन महिन्यांत कमबॅक असल्याने प्रेक्षकांना या मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे २८ एप्रिलपासून मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मंदार जाधवने यापूर्वी ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. यानंतर आता तो ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मंदारची ही ‘स्टार प्रवाह’बरोबर तिसरी मालिका आहे.