गेल्यावर्षी छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या पुनरागमनाची. चार वर्षांच्या ब्रेकनंकर मृणाल आपल्या कुटुंबासह भारतात परतली आणि अवघ्या काही महिन्यांतच तिने मालिकाविश्वात पुनरागमन केलं. ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मृणाल ( नंदिनी ) प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्यासह या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ( काव्या ), विवेक सांगळे ( जन्मजेय – जिवा ) आणि विजय आंदळकर ( पार्थ ) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्या शीर्षकावरुन तसेच पहिल्या प्रोमोवरून मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला होता. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तिच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशीब लागतं. मात्र प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. यावर आधारित मालिकेचं कथानक आहे.
या मालिकेत नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न ठरतं. तर, काव्या आणि जिवा या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. ठरल्याप्रमाणे नंदिनी-पार्थच्या लग्नाची सर्व तयारी होते. मात्र, त्यानंतर लग्नमंडपातून नंदिनीला किडनॅप केलं जातं. परिणामी, गावातील लोकांच्या दबावामुळे काव्या आणि पार्थचं लग्न होतं. दुसरीकडे जिवा नंदिनीला गुंडांच्या तावडीतून सोडवून आणतो. जिवा आणि नंदिनी लग्नमंडपात येणार एवढ्यात पार्थ-नंदिनी विवाहबंधनात अडकलेले असतात. यामुळे जिवा काव्यावर भयंकर संतापतो. तर, दुसरीकडे नंदिनीवर सुद्धा “आता तू लग्न कोणाशी करणार” असा दबाव दिला जातो.
हतबल झालेल्या आणि रडणाऱ्या नंदिनीला पाहून जिवा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. आता मालिकेत जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांचं लग्न पार पडलेलं आहे. हा मोठा ट्विस्ट पाहून प्रेक्षक सुद्धा चक्रावून गेले आहेत. आपल्या मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशी काव्याने कसं काय लग्न केलं, या मालिकेत नेमकं काय चालूये? अशा चर्चा रंगलेल्या आहेत. अशातच मालिकेचा आणखी एक प्रोमो सर्वांसमोर आला आहे.
नंदिनी ही काव्याची मोठी बहीण असते. पण, अचानक पार्थ-काव्याचं लग्न झाल्यामुळे काव्या आता नंदिनीची थोरली जाऊबाई झाली आहे. गृहप्रवेश झाल्यावर आत्याबाई मोठा डाव खेळते. या चौघांचं मन आणखी दुखावण्यासाठी आत्या नंदिनीला आपल्या धाकट्या बहिणीच्या म्हणजेच देशमुखांच्या मोठ्या सुनेच्या पाया पड असं सांगणार आहे. हे ऐकताच नंदिनी आणि काव्याचे डोळे पाणावतात.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. “ही फालतुगिरी कुठून सुचते तुम्हाला”, “लग्नाला उशीर झाला म्हणून कोण मेहुणीबरोबर लग्न करतं?”, “कुठल्या जगात जगत आहेत हे, एकमेकांशी घटस्फोट घेऊन परत लग्न करायचं. एवढं काय त्यात?”, “८ दिवस मालिकेत हाच सीक्वेन्स चालू आहे”, “स्टार प्रवाहवरची आतापर्यंत सगळ्यात जास्त ट्रोल झालेली मालिका म्हणजे… लग्नानंतर होईलच प्रेम” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली आहे.